सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सोसायटीतील कर्ज वसुलीच्या मागणीसाठी उपोषण


राहुरी : राहुरी नगरपरिषद मधील सेवानिवृत्त झालेल्या २३ कर्मचाऱ्यांवर नगरपरिषदकडून अन्याय होत आहे. यासाठी अहमदनगर जिल्हा नगरपालिका कामगार युनियनचे अध्यक्ष आनंद वायकर व उपाध्यक्ष अनंत लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी दिनांक २ फेब्रुवारी पासून नगरपरिषद कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. 

यावेळी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, राहुरी नगरपरिषद कामगार क्रेडीट को-ऑप. सोसायटी. राहुरी यांचेकडील कर्ज वसुलीसाठी राहुरी नगरपरिषदेतील २३ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती विषयक रजा रोखीकरण रक्कम (उपदाने) संबंधित कर्मचाऱ्यांची कोणतीही पूर्वसंमती घेतली नाही. संबंधित सोसायटीने सदर बाबत कोणतीही लेखी सुचना नगरपरिषदेचे मुख्याधिकारी या नात्याने कर्मचाऱ्यांना दिलेली नसतांना सदर २३ सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती विषयक रजा रोखीकरण रक्कम (उपदाने) बेकायदेशीरपणे कपात करण्यात आली. सद्य:स्थितीत अवसायनात असलेल्या नगरपरिषद सोसायटीकडे वर्ग करण्यात आलेली आहे. 
राहुरी नगरपरिषदचे हे धोरण हे पुर्णतः बेकायदेशीर व संबंधित २३ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारे आहे. त्यामुळे संबंधितांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सदरचे अन्याय कारक धोरणा विरोधात संबंधित सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे दि. १७ ऑक्टोबर २०२२ रोजी लेखी तक्रार दाखल केलेली असुन त्यांचे मार्फत १५ डिसेंबर २०२२ पर्यंत खुलासा सादर करण्याचे आदेशित करण्यात आले होते. परंतु अद्यापही सदर बाबत संबंधित वरीष्ठ अधिकाऱ्यांना कोणताही लेखी खुलासा सादर करण्यात आलेला नाही.
त्यामुळे संबंधित २३ सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांचे कुटुंबियांनी काल दि. २ फेब्रुवारी पासुन राहुरी नगरपरिषद कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. यावेळी सेवानिवृत्त कर्मचारी वसंत लाहूंडे, एकनाथ जगधने, प्रल्हाद  भारस्कर, विजय गायकवाड, लता मिसाळ, पोपट गायकवाड, नवनाथ घोडेकर, उत्तम दाभाडे, बापूसाहेब धनवटे, बाळासाहेब दाभाडे आदिंसह २३ कर्मचारी या उपोषणात सहभागी झाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या