मराठी भाषा गौरवदिनी विधानभवनात साहित्याची ज्ञानयात्रा

ज्ञानपीठ सन्मानित साहित्यकृतींचे अभिवाचनाने संस्मरण


मुंबई : कविकुलगुरू कुसुमाग्रज तथा वि.वा. शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी व तिचे संवर्धन करण्यासाठी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून विधानमंडळातील मराठी भाषा समितीतर्फे ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या मराठी लेखकांच्या साहित्यावर आधारित "मराठी साहित्याची ज्ञानयात्रा" या कार्यक्रमाचे आयोजन सोमवार, दिनांक २७ फेब्रुवारी, २०२३ रोजी दुपारी ३.०० ते ५.०० यावेळेत मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे करण्यात आले आहे. वि.स.खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, भालचंद्र नेमाडे या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या मराठी लेखकांच्या साहित्यकृतींचे अभिवाचनाद्वारे संस्मरण यावेळी करण्यात येईल.

हा कार्यक्रम मुख्यमंत्री . एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री,देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष . नरहरी झिरवाळ, मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुश्री फडणीस या करणार असून कार्यक्रमाची संहिता उत्तरा मोने यांनी तयार केली आहे. मराठी भाषेची, मराठी साहित्याची उंची वाढविणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यकृतींचे अभिवाचन या कार्यक्रमात सुप्रसिध्द अभिनेते डॉ. गिरीश ओक, लीना भागवत हे करतील. नचिकेत देसाई, धनश्री देशपांडे आणि अभिषेक नलावडे हे याप्रसंगी कविता गायन करतील. विधानमंडळातील या कार्यक्रमाच्या संयोजनाची जबाबदारी मिती क्रिएशन्स सांभाळत आहे. या कार्यक्रमास दोन्ही सभागृहांचे सन्माननीय सदस्य, पत्रकार, साहित्यप्रेमी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत आणि मराठी भाषा समितीचे उप सचिव विलास आठवले यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या