सहकारी निवडणुकांचा बिगुल वाजला

1 मार्चपासून निवडणूक प्रक्रिया  

मुंबई : कोरोना प्रादुर्भाव आणि अन्य नैसर्गिक आपत्तींमुळे  प्रलंबित राहिलेल्या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला. ही प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश जिल्हा सहकारी निवडणूक अधिकार्‍यांना देण्यात आलेले आहेत. त्यामुळे  1 एप्रिल 2021 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत निवडणुकीस पात्र असलेल्या अ, ब, क आणि  ड वर्गातील एकूण 20 हजार 638 सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया 1 मार्चपासून सुरु होणार असल्याची माहिती राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव  डॉ. पी. एल. खंडागळे यांनी दिली. निवडणूक होऊ घातलेल्या संस्थांमध्ये प्रामुख्याने राज्यातील 28 सहकारी साखर कारखाने, 3 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि 26 सहकारी सूतगिरण्यांचा समावेश आहे.

    राज्यात मार्च 2020 मध्ये कोरोनाची साथ आली. ही साथ नियंत्रणात येत असताना राज्य सरकारने शेतकर्‍यांना कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर अनुदानाची योजना राबवायला सुरुवात केली. त्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका सातत्याने पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता  राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने 15 फेब्रुवारी 2023 रोजीच्या आदेशानुसार 01 एप्रिल 2021 ते  31 डिसेंबर 2022 या कालावधीतील निवडणुकीस पात्र सर्व प्रकारच्या सहकारी संस्था (कृषि पतसंस्था आणि  बहुउद्देशीय सहकारी संस्था वगळता) यांच्या निवडणूक प्रक्रिया  1 मार्च 2023 पासून सुरू करण्याबाबत जिल्हा सहकारी निवडणूक अधिकार्‍यांना आदेश दिले  आहेत. या संस्थांच्या निवडणुकांसाठी 1 फेब्रुवारी 2023 या अर्हता दिनांकावर प्रारूप मतदार याद्या तयार करण्यात येणार  आहेत.

            त्याचप्रमाणे प्राधिकरणाने सन 2023 मधील  1 जानेवारी 2023 ते  31 डिसेंबर 2023 या कालावधीतील निवडणुकीस पात्र अ, ब, क व ड वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया संचालक मंडळाची मुदत संपण्यापूर्वी अनुक्रमे 150, 120, 60 आणि  60 दिवस अगोदर सुरु करण्याबाबत जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांना आदेश देण्यात आलेले आहेत. या संस्थांच्या निवडणुकांसाठी संचालक मंडळाची मुदत संपल्याच्या दिनांकावर प्रारूप मतदार याद्या तयार करण्यात येणार आहेत.

    ज्या सहकारी संस्था निवडणुकीसाठी  प्रारूप मतदार यादी सादर करणार नाहीत किंवा पुरेसा निवडणूक निधी उपलब्ध करणार नाहीत अशा संस्थांवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960, नियम 1961 आणि  महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम 2014 अंतर्गत कारवाई करण्याबाबतचे आदेश देखील जिल्हा सहकारी निवडणूक अधिकार्‍यांना  देण्यात आलेले आहेत. या आदेशानुसार अ, ब, क व ड वर्गातील अनुक्रमे 63, 1 हजार 14, 10 हजार 163 आणि  9 हजार 398 अशा एकूण 20 हजार 638 सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्या आहेत, असे खंडागळे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या