शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा महाआक्रोश मोर्चा

पुणे : शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळातर्फे सोमवारी शनिवार वाडा ते शिक्षण आयुक्त कार्यालयादरम्यान महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला. राज्यभरातील शिक्षकेतर कर्मचारी या मोर्चात सहभागी झाले होते. महाआक्रोश मोर्चा हा शासनाला इशारा असून, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची तातडीने दखल न घेतल्यास दहावी-बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार घालण्याची स्पष्ट भूमिका मांडण्यात आली.

महामंडळाचे राज्य सरकार्यवाह शिवाजी खांडेकर, राज्य अध्यक्ष अनिल माने, राज्य कार्याध्यक्ष मोरेश्वर वासेकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर, शिक्षण संस्थाचालक संघटना, मुख्याध्यापक संघटना, विविध शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य लिपिक हक्क परिषदेचे पदाधिकारी आदींनी या मोर्चात सहभाग घेतला. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शिक्षण सहसंचालक हरुण अत्तार,  आयुक्त कार्यालयातील प्रशासन अधिकारी राजेश शिंदे यांना निवेदन देण्यात आले. पुणे जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे विनोद गोरे, अध्यक्ष प्रसन्न कोतुळकर कार्याध्यक्ष देवेंद्र पारखे आदी यावेळी उपस्थित होते.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या आतापर्यंत अनेकदा शासन दरबारी मांडण्यात आल्या. मात्र या मागण्यांच्या पूर्ततेबाबत शासनाने काहीच कार्यवाही केली नाही. आता या मागण्यांची दखल शासनाने न घेतल्यास बेमुदत आंदोलन करण्यात येईल. तसेच दहावी, बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार घातला जाईल, असे खांडेकर यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या