आ. रोहित पवारांनी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कर्जत -जामखेडला नव्या तीस बस  



 जामखेड : कर्जत बस आगाराचा प्रश्न हा गेल्या वीस  ते पंचवीस वर्षांपासून प्रलंबित होता पण ते काम  आ. रोहित पवार यांनी दीड वर्षात मार्गी लावला. तसेच जामखेड येथील बस स्थानक पुनर्बांधणी व परिसरात व्यापारी गाळे बांधकाम  सध्या सुरू आहे. दोन्हीचं काम सध्या पूर्णत्वास जात आहे. त्यामुळे धोरणाप्रमाणे जेव्हा डेपोचं हे काम विशिष्ट टक्केवारीच्या पुढे जातं, तेव्हा बसेसची मागणी करावी लागते. जेणेकरून त्या संबंधित डेपोला बसेस उपलब्ध करून दिल्या जातात. याच अनुषंगाने आता हे काम ७० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे. तसेच विद्यार्थ्यांची व प्रवाशांची संख्या देखील अधिक असल्याने बसेसची कमतरता भासत आहे. अशातच कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन कर्जत व जामखेड तालुक्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या नव्या बसेस उपलब्ध करून देण्याबाबत मागणी केली आहे. 

 मुंबईत आ. रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मतदारसंघातील प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा व दोन्ही तालुक्याच्या परिवहनाची होणारी अडचण दूर करण्यासाठी दोन्ही तालुक्यांना मिळून ३० नवीन बसेस देऊन सहकार्य करावे अशी विनंती केली आहे. 

सदरील मागणीवर तात्काळ कार्यवाही करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिवहन सचिवांना प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर प्रक्रिया पुर्ण होऊन बसेस उपलब्ध झाल्यास त्याचा नक्कीच कर्जत-जामखेडकरांना फायदा होणार आहे . कोरोना असतानाही आ. रोहित पवार यांनी अवघ्या दीड वर्षात कर्जतला डेपो मंजूर करून आणला, तसेच भरघोस निधी देखील महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर करून आणला. त्याचं काम आता पूर्णत्वास होत आहे. अशातच विद्यार्थ्याची आणि प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून अधिक बसेस मिळाव्यात ही विनंती मुख्यमंत्र्यांकडे आ. रोहित पवार यांनी केल्यामुळे आता गेल्या अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित विषय या माध्यमातून मार्गी लागत असल्याचे दिसून येत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या