औरंगाबाद आणि उस्मानाबाद झाले इतिहासजमा!

नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी; उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली माहिती


मुंबई : औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. यापुढे औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव असे असणार आहे. उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे फडणवीस यांनी आभार मानले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकारने ‘करुन दाखविले’, असेही फडणवीस यांनी म्हटले. 

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नावाने मागील काही वर्षांपासून राजकारण सुरू आहे. नव्वदीच्या दशकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादला संभाजीनगर असे नाव देण्याची मागणी केली होती. त्यानंतर शिवसेनेकडून कायमच औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर म्हणून केला जातो. तर, उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव असा केला जातो. हिंदुत्ववादी संघटनांनीदेखील नामांतराची मागणी केली जात होती.  मुघल साम्राज्याचा बादशाह औरंगाबाद याने छत्रपती संभाजी राजे यांची हत्या केली. त्यामुळे त्याच्या नावाचे शहर नको. अशी मागणी घेऊन औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याची मागणी करण्यात येत होती.  आज याला केंद्र सरकारकडून परवानगी मिळाली आहे, त्यामुळे आता यापुढे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद धाराशिव म्हणून ओळखलं जाणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या