राज्यात मध्यावधी की राजकीय भूकंप?

१५ ते २० आमदार संपर्कात असल्याचा उद्योगमंत्री सामंत यांचा दावा


मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेले आमदार अपात्र ठरून राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील, उद्धव ठाकरेंच्या या विधानानंतर शिंदे गटाचे नेते उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मध्यावधीची शक्यता फेटाळताना पुन्हा दोन दिवसाचा राज्यात राजकीय भूकंप होईल, आमच्याकडे १७० आमदारांचं बहुमत आहे. शिवाय १५ ते २० आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा केला आहे.


उदय सामंत म्हणाले, “लोकशाहीमध्ये आणि मंत्रीमंडळ स्थापन करताना बहुमत महत्त्वाचं असतं. १७० आमदार आमच्याबरोबर आहेत, हे वारंवार आम्ही सांगितलं आहे. अजून १५ ते २० लोक आमच्या संपर्कात आहेत. येत्या एक-दोन दिवसात आपल्याला याची प्रचिती येईल. त्यामुळे मध्यावधी निवडणुका लागण्याची काहीही शक्यता नाही. आपले कार्यकर्ते सैरभैर होऊ नये. निवडणूक आयोगाच्या निकालामुळे आपल्या कार्यकर्त्यांना नैराश्य येऊ नये, म्हणून उद्धव ठाकरेंनी ते विधान केलं आहे.”

गेल्या काही दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू आहे. शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर ही सुनावणी सुरू असून शिवसेनेचा व्हीप मोडल्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात यावं, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर हे आमदार अपात्र ठरले, तर राज्याच्या राजकारणात काय घडणार? याविषयी तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी यासंदर्भात एक मोठं विधान केलं आहे. उद्धव ठाकरेंनी राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता बोलून दाखवली आहे. “कसब्यात काँग्रेस आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादी यांना आपल्याला विजयी करावंच लागेल. पण माझा अंदाज आहे की विधानसभेची मध्यावधी निवडणूक लागेल किंवा लागू शकेल. कारण अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ते आमदार जर अपात्र ठरले तर आपल्या राज्यात मध्यावधी लागू शकतात”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या