महाविकास आघाडीत मध्यावधीवरून मतभिन्नता

मध्यावधी लागणार : उद्धव ठाकरे ; मध्यावधी लागतील असे वाटत नाही : पवार 

मुंबई : पक्ष पक्षचिन्ह आणि १६ आमदारांच्या अपात्रतेचा  विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाच या विषयावरून महाविकास आघाडीत मतभिन्नता असल्याचे समोर आले आहे. आमदार अपात्र झाल्यानंतर राज्यात मध्यावधी लागतील, असा दावा शिवसेना उद्धव ठाकरे  गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी केला आहे. तर आघाडीचे सर्वेसर्वा व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मात्र मध्यावधी निवडणुकांची शक्यता फेटाळून लावली आहे. मध्यावधी निवडणुका आत्ता लागतील, असं मला वाटत नाही, असे सांगत पवार यांनी ठाकरेंच्या दाव्यातील हवा काढून घेतली आहे. 

पुण्यातील पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे ऑनलाइन पद्धतीने उपस्थित झाले होते. त्यावेळी बोलत असतांना उद्धव ठाकरे यांनी ही शक्यता वर्तवली होती. गेल्या काही दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू आहे. त्यामध्ये शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्दादेखील प्रलंबित आहे. त्यासोबतच केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावरच हल्लाबोल केला होता. त्यामध्ये उद्धव ठाकरे राज्यांमध्ये मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या याच विधानावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे म्हणताय म्हणजे काहीतरी तथ्य असेल, असेही म्हंटले आहे.

त्यावरून राज्यातील राजकारणात उद्धव ठाकरे यांच्यासहित संजय राऊत यांनी केलेल्या विधानावरुन उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. विविध पक्षातील नेतेही यावर प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. राज्याच्या राजकारणात मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता आहे का असा प्रश्न राजकारणातील जेष्ठ नेते असलेल्या शरद पवार यांनाही विचारण्यात आला होता. उद्धव ठाकरे यांनी  कशाच्या आधारे हे वक्तव्य केलं हे मी जाणून घेतलेलं नाही. पण मध्यावधी निवडणुका आत्ता लागतील असे  मला वाटत नाही, असे पवार म्हणाले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या