मतभेद नाही; काँग्रेस एकसंध!

नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांचे सुरात सूर 



मुंबई : नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीच्या तिकिटावरून काँग्रेस पक्षांतर्गत निर्माण झालेला वाद अखेर शमला. प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे झालेल्या राज्यातील नेत्यांच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे विधिमंडळ  पक्षनेते बाळासाहेब थोरात यांचे अखेर सुर जुळले. आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत; काँग्रेस पक्ष एकसंध आहे, असा संदेश दोघांनी राज्यभरातून आलेल्या काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला. त्याचबरोबर आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस करिष्मा घडविल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. 
भारत जोडो यात्रा यात्रेचा संदेश राज्यभर पोहचवण्यासाठी हाथ से हाथ जोडो अभियान राज्यात सुरु करण्यात आले असून घरोघरो जावून राहुल गांधींचा संदेश पोहचवा. भारत जोडो यात्रेमुळे जनतेत सकारात्मक संदेश गेला आहे. अमरावती व नागपूर विधान परिषद निवडणुकीत भाजपाचा पराभव करून काँग्रेसने विजय मिळवला आहे. कसबा व चिंचवडच्या पोटनिवडणुकीतही मविआचेच उमेदवार विजयी होतील. भाजपाच्या कारभाराला जनता कंटाळली असून त्यांचा पराभव करण्यासाठी आगामी विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीतही काँग्रेसला एक नंबरचा पक्ष करण्याचा संकल्प करा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.  
प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे काँग्रेस कार्यकारिणीची बैठक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, चंद्रकांत हांडोरे, आ. प्रणिती शिंदे, खासदार कुमार केतकर, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, हुसेन दलवाई, माजी केंद्री मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, सुनिल केदार, यशोमती ठाकूर, डॉ. विश्वजित कदम, सतेज बंटी पाटील, वसंत पुरके, महिला काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे, एनएसयुआयचे आमीर शेख, आमदार, जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
       नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या हुकूमाशाही कारभाराला देश कंटाळला आहे. भाजपा व मोदी कोणतेचे नियम कायदे पाळत नाही. खा. राहुल गांधी व राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचे संसदेतील भाषण वगळण्यात आले आहे. राहूल गांधी यांनी मोदी व अदानी यांच्या संबंधाबद्दल प्रश्न विचारला होता पण मोदी सरकारने मनमानी पदधतीने त्यांचे भाषण कामकाजातून वगळून संसदेतच लोकशाहीचा खून केला. मोदी सरकारमध्ये शेतकरी, तरुण, छोटे व्यापारी, पत्रकार, प्रसार माध्यमांवर अत्याचार केले जात आहेत, त्यांना देशोधडीला लावले जात आहे. हाथ से हाथ जोडो अभियानाच्या माध्यमातून घरोघरी जावा आणि भाजपा व मोदी सरकारच्या पापाचा पाढा वाचून दाखवा असे आवाहन पटोले यांनी केले.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यावेळी म्हणाले की, राज्यातील राजकीय परिस्थिती अस्थिर आहे, विधान परिषदेच्या निवडणुकीतील वातावरण पाहता राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला भिती वाटू लागली आहे म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टाळल्या जात आहेत. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकाही एकत्रितच घेतल्या जाण्याची शक्यता आहे. आगामी वर्ष हे महत्वाचे आहे. अमरावती व नागपूर विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेचा विजय झाला असून ही विजयाची पहिली पायरी आहे. आता आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या कामाला आतापासूनच लागा असे चव्हाण म्हणाले.  
अमरावती पदवीधर मतदारंसघातून विजयी झालेले धीरज लिंगाडे व नागपूर शिक्षक मतदार संघातून विजयी झालेले सुधाकार आडबाले यांचा सत्कार करण्यात आला तसेच राहुल गांधी यांच्या सोबत कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रेत सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील भारत जोडो पदयात्रींचा गौरव करण्यात आला. या बैठकीची माहिती नंतर पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या