खा.प्रितमताई मुंडे यांनी केंद्र सरकारकडे मांडल्या ऊसतोड मजुरांसह असंघटित कामगारांच्या मागण्या
दिल्ली । दि.०८ । असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या व प्रामुख्याने ऊसतोड मजूर आणि बिडी वर्कर्सच्या विविध मागण्यांसाठी खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केंद्रीय कामगार मंत्री भुपेंद्र यादव यांची भेट घेतली. असंघटित कामगारांच्या मागण्या यावेळी त्यांनी सादर करून देशात नव्याने लागू होणाऱ्या लेबर कोड संदर्भात चर्चा केली.
नव्या लेबर कोडमध्ये ऊसतोड मजुरांसह बिडी वर्कर्स, असंघटित कामगारांसाठी विशेष तरतुदी करण्याच्या मागण्या त्यांनी भपेंद्र यादव यांच्याकडे सादर केल्या.
देशातील असंघटित कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा,ई-श्रम पोर्टलवर त्यांची नोंदणी करण्यात यावी. स्थलांतरित कामगारांच्या श्रेणीनुसार असंघटित कामगारांचा उल्लेख लेबर कोडमध्ये असावा. तसेच कामगारांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणाऱ्या आणि त्यांच्या आरोग्य व पाल्यांच्या शिक्षणाची जवाबदारी सुनिश्चित करून महिला कामगारांच्या आरोग्याचा विचार करणाऱ्या विशेष तरतूदी नव्याने तयार होणाऱ्या लेबर कोडमध्ये असाव्यात या मागण्या खा.प्रितमताई मुंडे यांनी भुपेंद्र यादव यांच्याकडे केल्या आहेत.
देशातील असंघटित कामगारांना अत्यंत कठीण आणि जिकरीची कामे करावे लागत आहेत, त्यांच्या कामाच्या पद्धतीत सुधारणा करणारा आणि महाराष्ट्रातील कामगारांचा विचार करणारा सर्वसमावेशक लेबर कोड तयार होईल अशी अपेक्षा त्यांनी केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांच्याकडे व्यक्त केली.या भेटीत असंघटित कामगारांच्या विविध मागण्यांवर अतिशय अभ्यासपूर्ण आणि सकारात्मक चर्चा झाली.
कामगारांच्या मागण्यांचा प्राधान्याने विचार करू व पुढील काळात मजुरांची देखील भेट घेऊ असा विश्वास भुपेंद्र यादव यांनी दिला असल्याचे खा.प्रितमताई मुंडे यांनी सांगितले.
0 टिप्पण्या