आ. सत्यजित तांबेंकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुकसंगमनेर : नाशिक पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे उमेदवारीपासून चर्चेत असून त्यांनी राजकीय वातावरण ढवळून काढले असताना आता त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तोंड भरून कौतुक केले आहे. 'कामाचा माणूस' अशी ओळख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सिद्ध केली असल्याचे ते म्हणाले.

नेमके काय घडले आणि आमदार तांबे असे का म्हणाले... सत्यजित तांबे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे जिल्ह्यातील सावरदेव गावच्या विद्यार्थ्यांना तानसा धरणातून कराव्या लागणाऱ्या जीवघेण्या प्रवासाबद्दल दखल घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी एका पत्राद्वारे केली होती. आपल्या पत्रात त्यांनी म्हटले होते की, शहापूर तालुक्यातील तानसा धरण पाणलोट क्षेत्राच्या आसपासच्या सात आदिवासी पाड्यांमधील 200 कुटुंबांना हॉस्पिटल, शाळा व इतर सुविधांसाठी अत्यंत जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. येथील लोक असुरक्षित अशा प्लास्टिक पाईपच्या तरफ्यातून जीव मुठीत धरून प्रवास करत आहे. पर्यायी मार्ग नसल्यामुळे सावरदेव जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या अनेक विद्यार्थी व पालकांना रोज हा संघर्ष करावा लागणं, हे अत्यंत दुर्दैवी आहे. तरी या प्रवाशांसाठी तातडीने किटची व्यवस्था करावी. तसेच, त्यांना सुरक्षित वाहतुकीचा पर्याय मिळवून देण्यासाठी लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी मागणी देखील तांबे यांनी या पत्रातून मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली होती.
त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून सावरदेव गावच्या विद्यार्थ्यांना दोन स्पीड बोट व लाईफ जॅकेट पुरविण्यात आल्याची माहिती समजल्यानंतर आमदार तांबे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. तसेच कामाचा माणूस अशी ओळख एकनाथ शिंदे साहेब यांनी पुन्हा एकदा सिद्ध केली असे म्हणत त्यांचे कौतुक देखील केले आहे.
या संदर्भात एका समाज माध्यमावर त्यांनी माहिती टाकली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या