आ. सत्यजित तांबे काँग्रेसमध्येच राहणार!

आ. बाळासाहेब थोरात यांचे संकेत; नाना पटोले अशोक चव्हाण यांचेही केले कौतुक


संगमनेर : ‘सत्यजित, तुला काँग्रेसशिवाय आणि काँग्रेसलाही तुझ्या शिवाय करमणार नाही. त्यामुळे तू किती दिवस अपक्ष राहणार, हे आपण ठरवू,’ असे सांगत आ. सत्यजित तांबे काँग्रेसमध्ये राहणार असल्याचे संकेतही माजी महसूल मंत्री काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिले. भारत जोडो यात्रेच्या नियोजनाबद्दल बोलताना थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचेही कौतुक केले, हेही विशेष.


संगमनेरमध्ये येताच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले आमदार सत्यजीत तांबे यांना मोलाचा सल्ला दिला आहे. मधल्या काळात टीका करणारे त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचाही थोरात यांनी समाचार घेतला.
थोरात आज सायंकाळी संगमनेरला आले. संगमनेरमध्ये कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना थोरात यांनी सुरुवातीला नागपूरमध्ये आपण कसे घसरून पडलो. त्यानंतर पुढे कसे उपचार झाले. या विषयी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर घडलेल्या राजकीय घडामोडींबद्दल ते म्हणाले, मधल्या काळात पक्षात जे घडले, त्यासंबंधी मी कधीही मीडियासमोर आलो नाही. पक्षातील विषय असे चव्हाट्यावर आणणे मला पसंत नाही. त्या दिवशी मी संगमनेरकरांशी ऑनलाइन संवाद साधला, त्यावेळी वरिष्ठांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख केला होता. मात्र, तेव्हा मीडिया येथे उपस्थिती असणार याची मला कल्पना नव्हती. माझ्या त्या बोलण्याचे पुढे मीडियाने मोठे भांडवल केले. बरे झाल्यावर मी याआधीच संगमनेरला यायला निघालो होतो. मात्र, पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील मुंबईत भेटायला येणार असल्याने थांबलो. त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली आहे. मुळात सत्यजीत यांनी अपक्ष उमेदवारी करण्यामागे तांत्रिक चुकीचे कारण आहे. जर माझे हे दुखणे नसते आणि मी नाशिकमध्ये असतो, तर ही चूकही झाली नसती. सध्या जरी सत्यजित अपक्ष असले तरी ते फार काळ अपक्ष राहणार नाहीत. भारत जोडा यात्रेत त्यांनीही मोठे काम केले आहे. काँग्रेसचा विचार त्यांच्यात रुजला आहे. आम्ही कोणाही काँग्रेसशिवाय दुसरा विचार करू शकत नाही. त्यामुळे सत्यजित यांना काँग्रेसशिवाय आणि काँग्रेसलाही सत्यजीतशिवाय करमणार नाही. त्यामुळे त्यांचा काय निर्णय करायचा, ते लवकरच करू, असेही थोरात म्हणाले.
भाचा सत्यजीत यांना सल्ला देताना थोरात म्हणाले, सत्यजित तुमच्या विजयात डॉ. सुधीर तांबे यांचा मोठा आहे. एवढ्या मोठ्या मतदारसंघात त्यांचा दांगडगा जनसंपर्क आहे. असेच काम तुम्हालाही करायचे आहे, हे लक्षात ठेवा. पुढे अपक्ष राहायचे की काय करायचे हेही आपण लवकरच ठरवू, असेही थोरात म्हणाले. थोरात यांच्या कन्या डॉ. जयश्री देशमुख यांचा वाढदिवस नागरिकांनी साजरा केला होता. त्याबद्दल थोरात यांनी नागरिकांचे आभार मानले. डॉक्टर असूनही जयश्री राजकारणात रमत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या