मामा आ. बाळासाहेब थोरात यांच्या परतीच्या आवाहनानंतरही आ. सत्यजित नव्या दिशेच्या शोधत...
'उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी..... घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी', अशा सूचक ओळी ट्विट करून आ. सत्यजित तांबे यांनी आपण काँग्रेस पक्षात परतणार नसल्याचे सूचित केले आहे. त्यामुळे मामा काँग्रेस नेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या आवाहनानंतर देखील आ. तांबे पक्षावर नाराज असून ते पुन्हा नव्या पक्षाच्या शोधत असल्याचे स्पष्ट होत आहे. सत्यजित यांना अपेक्षित नवी दिशा कोणती..? याबाबत राजकीय निरीक्षकांकडून वेगवेगळ्या अटकळी बांधल्या जात आहेत.
नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अपक्ष लढवल्यामुळे काँग्रेसमधून निलंबित झालेले नवनिर्वाचित आमदार सत्यजीत तांबे यांच्या आगामी राजकीय भूमिकेबाबत सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. सत्यजीत तांबे यांचे मामा आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी कालच सत्यजीत तांबे यांना अप्रत्यक्षपणे घरवापसीची साद घातली होती. मात्र, त्याच्या दुसऱ्याच दिवशी सत्यजीत तांबे यांनी सदर ट्विट करुन आपण आता माघार घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचे सूचित केले आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीपूर्वी सत्यजीत तांबे हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. नंतरच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही सत्यजीत तांबे यांच्यासाठी फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे. त्यामुळे सत्यजीत तांबे काँग्रेस पक्षात राहणार की नवी वाट धुंडाळणार, याविषयी अनेक शक्यता व्यक्त केल्या जात होत्या. परंतु, सत्यजीत तांबे यांचे ट्विट पाहता, ते नव्या राजकीय वाटा धुंडाळण्याच्या मानसिकतेत दिसत आहे. तसेच महाराष्ट्राच्या राजकारणात स्वत:ची स्वतंत्र ओळख प्रस्थापित करण्याचा सत्यजीत तांबे यांचा इरादाही या ट्विटमधून प्रतित होत आहे. यावर बाळासाहेब थोरात आणि महाविकास आघाडीचे नेते आता काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
बाळासाहेब थोरात यांच्या हाताला दुखापत झाल्यामुळे गेले काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते. सोमवारी बाळासाहेब थोरात अनेक दिवसांनी त्यांचा बालेकिल्ला असणाऱ्या संगमनेर तालुक्यात परतले. यावेळी केलेल्या भाषणात बाळासाहेब थोरात यांनी आपले भाचे सत्यजीत यांना एक मोलाचा सल्ला दिला होता. 'सत्यजीत, तुला काँग्रेसशिवाय आणि काँग्रेसलाही तुझ्या शिवाय करमणार नाही. त्यामुळे तू किती दिवस अपक्ष राहणार, हे आपण ठरवू',असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले होते.
_______
सत्यजित तांबे यांचे ट्विट.....
उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी…
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) February 14, 2023
नजरेत सदा नवी दिशा असावी ।
घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही…
क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी ।
0 टिप्पण्या