श्री मोहिनीराज यात्रेच्या मुख्य दिवशी हजारो भाविकांच्या उपस्थितीत दहीहंडी फोडून काला

नेवासा : श्री मोहिनीराजांच्या यात्रेनिमित्त शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता रेवड्यांची उधळण करत काल्याची दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी काल्याचे वाटप करण्यात आले. काला घेण्यासाठी हजारो भाविकांनी मंदिर प्रांगणात गर्दी केली होती. शनिवारी दि.११ फेब्रुवारी रोजी कुस्त्यांच्या जंगी हंगाम्याने पंधरा दिवस चाललेल्या यात्रा महोत्सवाची सांगता होणार आहे. यात्रा महोत्सव काळात लाखो भाविकांनी भगवान विष्णूंचा स्त्रीरूप असलेल्या श्री मोहिनी अवताराचे दर्शन घेतले.

श्री मोहिनीराजांच्या यात्रा महोत्सवाला रथसप्तमी पासून प्रारंभ झाला होता. सप्ताहभर येथे भागवत कथा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यात्रा उत्सव काळात गुरुवर्य भास्करगिरी महाराज, शिवाजी महाराज देशमुख,उद्धव महाराज मंडलिक,आमदार शंकरराव गडाख,माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी भेट देऊन उत्सवमूर्तीसह मोहिनीराजांचे दर्शन घेतले
शुक्रवारी दि.१० फेब्रुवारी रोजी यात्रेच्या मुख्य दिवशी श्री मोहिनीराज मंगल कार्यालयामध्ये दुपारी उत्सवमूर्ती समोर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर सायंकाळी ५.३० च्या सुमारास पाकशाळा येथे मानानुसार नेवासा  येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री व्ही.वाय.जाधव न्यायाधीश महोदयांच्या हस्ते पालखीची पूजा करण्यात आली आणि पाकशाळा येथूनच उत्सवमूर्तीच्या पालखी मिरवणुकीला प्रारंभ झाला.
          
यात्रेच्या निमित्ताने शुक्रवारी रात्रभर पालखी ग्राम प्रदक्षिणेसाठी निघाली. यावेळी सुवासिनींनी पंचारती ओवाळून उत्सव मूर्तीचे औक्षण केले. तोफांची सलामी व फटाक्यांची आतषबाजीने ग्राम प्रदक्षिणेसाठी निघालेल्या पालखीचे उत्स्फूर्त स्वागत नेवासा शहरासह मुख्य पेठेत व नेवासा बुद्रुक व परिसरात करण्यात आले.
शनिवारी दि.११ फेब्रुवारी रोजी कुस्त्यांच्या जंगी हंगाम्याने पंधरा दिवस चालणाऱ्या श्री मोहिनीराजांच्या यात्रेची सांगता होणार आहे. यात्रेत जागे अभावी दुकानांची कमतरता जाणवली.
यात्रेच्या निमित्ताने विविध संघटना व संस्थेच्या वतीने नेवासा शहरातील चौकाचौकात व ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय करे होमगार्ड समादेशक बाळासाहेब देवखिळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व होमगार्ड यांचा चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या