भूकंपामुळे तुर्कीची जमीन ५ मीटरने सरकली..!

                  

  तुर्की आणि सीरियामध्ये निसर्गाचा मोठा प्रकोप पाहायला मिळाला. हे दोन्ही देश भूकंपाच्या प्रचंड मोठ्या धक्क्याने हादरले. ७ रिस्टर स्केलपेक्षा मोठ्या धक्क्याने क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. भूकंपामुळे दोन्ही देशात मोठ्या प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली. भूकंपामुळे २० हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. जखमींची तर गणतीच नाही. भूकंपाची भीषणता पाहता मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. 

या विनाशकारी भूकंपानंतर जगभर हळहळ व्यक्त होत आहे. या प्रलयंकारी भूकंपाने ३० वर्षांपूर्वी महाराष्ट्रात झालेल्या प्रलयंकारी भूकंपाची आठवण झाली. ३० सप्टेंबर १९९३ रोजी लातूर उस्मानाबाद सीमेवर झालेला हा भूकंप  महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील सर्वात विनाशकारी भूकंप मानला जातो. ६.८ रिस्टर स्केलच्या या भूकंपात जवळपास ८ हजारांहून अधिक नागरिक मरण पावले होते तर २० हजारांच्या आसपास नागरिक जखमी झाले होते. या भूकंपात दोन्ही जिल्ह्यातील जवळपास ५२ गावे जमीनदोस्त झाली होती. आता तुर्की आणि सीरियामध्येही जवळपास हीच परिस्थिती आहे. जाणकार तर या भूकंपाला आजवरचा सर्वात मोठा भूकंप मानत आहे. २०११ मध्ये जपानमध्ये असाच प्रलयंकारी भूकंप आला होता मात्र तिथे इतक्या मोठ्याप्रमाणात जीवितहानी झाली नव्हती. २०११ मध्ये जपानमध्ये भूकंप झाला तेंव्हा तेथील जमीन सरकल्याचा दावा भू वैज्ञानिकांनी केला होता आताही तसाच दावा केला जात आहे. तुर्की सीरियामध्ये झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू तुर्की होता. भूकंप झाल्यानंतर इथल्या टेक्टोनिक प्लेट्स ५ मीटर सरकल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. तुर्की ३ टेक्टोनिक प्लेट्समध्ये वसले आहे. या प्लेट्स म्हणजे अनाटोनिक्स टेक्टोनिकप्लेट्स, युरेशियन आणि अरेबिक प्लेट्स. तज्ज्ञांच्या मते अनाटोनिक्स टेक्टोनिक प्लेट्स आणि अरेबियन प्लेट्स २२५ किलोमीटर दूर सरकल्या आहेत. 

त्यामुळे तुर्की आपल्या भौगोलिक स्थानापासून ५ मीटर दूर सरकली आहे. अर्थात भूकंप झाल्यानंतर टेक्टोनिक प्लेट्स सरकणे ही नवी बाब नसली तरी इतक्या मोठ्या प्रमाणात   टेक्टोनिक प्लेट्स सरकल्याने तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. टेक्टोनिक प्लेट्स सरकल्याने भविष्यात या भागात आणखी भूकंप होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली असून नद्यांची दिशाही बदलू शकते अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या