साडेतीनशे कोटी रुपयांची फसवणूक; राजकीय नेत्यांचा समावेश?
क्रिप्टो करन्सी कॉइनच्या (Cryptocurrency Coins) नावाखाली आर्थिक फसवणून प्रकरणी आरोपी किरण खरात व त्यांची पत्नी दीप्ती खरात यांच्यासह माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचा जावई विजय झोल (Vijay Zol) व अन्य साथीदार अजूनही फरार आहेत. या घोटाळ्यात खोतकर यांचाही हात असल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला आहे. तर गोरंट्याल यांनीच आरोपींना मदत केल्याचा प्रत्यारोप खोतकर यांनी केला आहे. आरोप-प्रत्यारोपांमुळे जालन्याचे राजकीय वातावरण पेटले असले तरी यात अनेकांचे कोट्यवधी रुपये बुडाले, हे मात्र खरे!
जालन्यात GDC क्रिप्टो करन्सी कॉइनच्या (GDC Cryptocurrency Coins) नावाखाली कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणुकीचा प्रकार समोर आलाय. जालना पोलिसांनी या घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल करून याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवला आहे. मात्र या घोटाळ्याची व्याप्ती आता दिवसेंदिवस वाढत असल्याचे समोर येत आहे. या प्रकरणात आतापर्यंत आर्थिक गुन्हे शाखेकडे जवळपास 103 तक्रारी दाखल झाल्या आहेत. या सर्व तक्रारदारांचे जबाब घेण्याचे काम आर्थिक गुन्हे शाखेकडून केले जात आहे. सर्वाधिक गुंतवणूक केलेल्या 17 जणांचा पोलिसांनी जबाब घेतला आहे. इतरांचाही जबाब घेतला जात असल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे यातील आरोपी किरण खरात व त्यांची पत्नी दीप्ती खरात यांच्यासह विजय झोल (Vijay Zol) व अन्य साथीदार अजूनही फरार आहेत.
ऋषिकेश काळे यांच्या तक्रारीवरून क्रिप्टो करन्सी कॉइन (जीडीसी कॉइन) प्रमोटर संशयित किरण खरात आणि त्यांची पत्नी दीप्ती खरात यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडे जवळपास 103 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. विशेष म्हणजे यात सर्वाधिक गुंतवणूक करणाऱ्या 17 जणांनी जवळपास एक कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यांचे पोलिसांनी तातडीने जबाब घेतले आहेत. त्यांच्याकडून बँक पासबूक, आधार कार्ड यासह इतर महत्त्वांची कागदपत्रे घेतली जात आहेत. इतर तक्रारदारांची गुंतवणूक कमी आहे. त्यांचेही जबाब घेतले जात आहे. दरम्यान, ज्या लोकांची फसवणूक झाली आहे, त्यांनी तक्रारी करण्याचे आवाहन देखील पोलिसांकडून करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या