Breaking News : ‘गंगामाई’त इथेनॉलचा भडका

  • पाच किलोमीटरपर्यंतचा परिसर निर्मनुष्य
  • कारखान्याचा मोठ्या प्रमाणात भाग जळून खाक


प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री

शेवगाव : अहमदनगर - औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवरील शेवगाव तालुक्यातील गंगामाई साखर कारखान्याच्या डिसलेरी विभागाला शनिवारी सायंकाळी भीषण आग लागली. या आगीमध्ये कारखान्याचा मोठ्या प्रमाणात भाग जळून खाक झाला. आगीची आणि स्फोटांची तीव्रता इतकी अधिक होती की, प्रशासनाला सुमारे पाच किलोमीटरपर्यंतचा परिसर निर्मनुष्य करावा लागला. 

पाथर्डी, शेवगाव, पैठण आणि अहमदनगर येथून ही आग आटोक्यात आणण्यासाठी विविध पालिका आणि कारखान्यांचे अग्निशामक दलाचे बंब कारखाना कार्यस्थळी दाखल झाले. कारखान्यापासून पाच किलोमीटरचा परिसर निर्मनुष्य करण्यासाठी तहसीलदार आणि पोलीस प्रशासन यांनी घटनास्थळी धाव घेतली. या आगीमध्ये जीवितहानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. 

शेवगाव तालुक्यातील बाभूळगाव येथील गंगामाई साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाला शनिवारी सायंकाळी आठ वाजण्याच्यासुमारास मोठी आग लागली आहे. ही आग इथेनॉल प्रकल्पाच्या टाक्या फुटल्याने लागली. परिसरातील नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार तीन टाक्यांचे स्फोट झाले. 


इथेनॉलमुळे आगीने रौद्ररूप धारण केले. कारखाना परिसरातून नागरिकांना दूर राहण्याचे आदेश देण्यात आले. रात्री उशिरापर्यंत कारखाना प्रशासन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होते. मात्र आग आटोक्यात येत नव्हती. सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून कारखान्याच्या परिसरातील नागरिक, कामगार, कर्मचारी यांना सुरक्षीतस्थळी हलवण्यात आले. आगीमुळे परिसरात हाहाकार मजला. शेतकर्‍यांना संकटकाळी मदत करणारा कारखाना पाहता पाहता आगीच्या भक्षस्थानी पडल्याने शेतकर्‍यांमधून हळहळ व्यक्त होत आहे. 

सतर्कतेने जीवित हानी मात्र टळली


या घटनेत सर्व कामगार सुखरूप असून दोन ते तीन कामगार किरकोळ जखमी झालेले आहेत. कोणीही दवाखान्यात दाखल झालेले नाही. या कारखान्यात जवळपास 35 कामगार काम करतात. मात्र पाच वाजता सुट्टी होत असल्याने अनेक कामगार बाहेर पडले होते अशी माहिती प्रशासनाकडून देण्यता आली.

सोशल मीडियात 50 लोक जखमी झाल्याची अफवा पसरली होती, त्यावर रणजित मुळे यांनी खुलासा करत या स्फोटात कुठलीही जीवित हानी झाली नाही. अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. दरम्यान जखमींना घेवून एक वाहन औरंगाबादच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या