विशेष प्रतिनिधी l राष्ट्र सह्याद्री
श्रीरामपूर : येथील वायकर टोळीचा म्होरक्या संतोष वायकर याच्यावर कंदुरी जेवणावेळीत झालेल्या वादावरून गोळीबार करण्यात आला. संतोष वायकर कारमध्ये बसल्यानंतर त्याच्यावर गोळी झाडण्यात आली. गोळी झाडणारा त्याच्याच टोळीतील पूर्वाश्रमीचा साथीदार आहे. विष्णू लाड असे त्याचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सध्या लाड हा स्वतंत्र टोळी चालवतो.
शनिवारी सकाळी झालेल्या गोळीबार प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विष्णू लाड याने गावठी बनावटीच्या बंदुकीतून संतोष वायकर यांच्यावर गोळीबार केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांना माहिती पुरवल्याच्या रागातून हा गोळीबार झाला असल्याची पोलिसांची माहिती आहे.
दरम्यान, गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, संतोष वायकर व विष्णू लाड एका साथीदाराच्या घरी कंदुरी जेवणासाठी उपस्थित होते. शुक्रवारी रात्री झालेल्या या कंदुरीला रिपब्लिकन पक्षाचा एक नेताही आमंत्रित होता. संबंधित नेत्यासमोर संतोष आणि विष्णू यांच्यात वाद झाले होते. याच वादाचे पर्यावसन शनिवारी सकाळी गोळीबारात झाले.
वायकर आणि लाड टोळीवरती नगर जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यातही अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गुन्ह्यात संतोष वायकर व विष्णू लाड दोघांनाही एकाच गुन्ह्यात पोलिसांनी नेले होते. त्या गुन्ह्याची कबुली विष्णू लाड याने दिली असल्याचे समजते. तसेच जालना येथील व्यापारी लूटप्रकरणाची ही कबुली लाडने दिल्याचे कळते.
वायकर टोळी फूट पडल्यामुळे पोलिसांना टोळीच्या गुन्हेगारीबद्दल आणखी माहिती मिळण्याची शक्यता असून या टोळीने केलेल्या इतर गुन्ह्यांचीही लवकरच उकल होणार, यात शंका नाही. विशेष म्हणजे श्रीरामपूर शहरासह नगर जिल्ह्यातील काही नामवंत सोनार या टोळीकडून गुन्ह्यातील सोने खरेदी करत असल्याचे समजते.
पोलिसांनी लाड याला अटक केली असली तरी अद्याप गोळीबार केलेले हत्यार जप्त केलेले नाही. गोळीबाराच्या घटनेतील तपास पूर्ण झाल्यानंतर लाड याला कोतवाली तसेच जालना पोलिसांकडे हस्तांतरित केले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस होतील, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
0 टिप्पण्या