भुसावळचे प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे निलंबित

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे विधानसभेत घोषणा

 भूसावळ : भुसावळचे प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी (दि. २१) सभागृहात दिली. प्रांतधिकारी सुलाने यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत निलंबन केल्याचे म्हटले आहे.

भुसावळ प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यद्धत्तीविषयी आक्षेप घेत अनेक तक्रारी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केल्या असून बोदवड येथील गौण खनिज प्रकरणाबाबत लक्ष वेधण्यात आले होते. मूळात शेती प्रयोजनासाठी जागा असताना तेथे गौण खनिजाची उत्खननाला परवानगी देण्यात आली. तसेच त्यानंतर तेथेच दंडात्मक कारवाई करण्यात आली व नंतर पुन्हा उत्खनन केल्यानंतर दंडाला स्टे देण्यात आल्याचा अजब प्रकार प्रांताधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारात अधिकार नसताना बेकायदा केल्याचा आरोप आहे.

भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी देखील वेल्हाळे येथील आदिवासी जमिनीचे हस्तांतरणाचे अधिकार नसताना प्रांताधिकाऱ्यांनी अधिकाराचे उल्लंघण केल्याची तक्रार केली होती.या शिवाय भुसावळातील मेझॉनिक लॉज कुळ कायद्यात बसत नसताना हस्तांतरणाची परवानगी प्रांताधिकाऱ्यांनी दिल्याचा दावा देखील सभागृहात केला. या संदर्भात आमदार संजय सावकारे म्हणाले की, भुसावळातील प्रांताधिकाऱ्यांनी अनेक निर्णय बेकायदा घेतले असून ज्या बाबींचा त्यांना अधिकार नाही त्याबाबतही त्यांनी अनेक निर्णय घेतले आहेत. भुसावळातील पारशी समाजाच्या जागेचा हस्तांतरणाचा प्रयत्न सुरू असून त्याबाब ज्यांनी कुणी व्यवहार केला असल्यास सावध राहण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. या जागेतही गैरप्रकार होण्याची भीती त्यांनी वर्तवली आहे. प्रांताधिकारी सुलाणे यांना निलंबित करण्यात आल्याची घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केल्याची माहिती आमदारांनी दिली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या