सहकार नेते म्हणून मिरवणाऱ्यांनी कवडीमोल भावात कारखाने नातेवाईकांना विकले

 खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी घेतला विरोधकांचा समाचार 
छाया : परेश कापसे 



 पारनेर : 
        सहकार नेते म्हणून मिरवणाऱ्यांनी मागील काळात सहकार मोडीत काढून सहकारी साखर कारखाने चक्क कवडीमोल भावात आपल्या नातेवाईकांना विकले ते आमच्यांवर चोर दरोडेखोर म्हणून टीका करत असतील, तर हे किती हास्यास्पद आहे, अशी टीका खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली. अशा लोकांना त्यांच्याच भाषेत आता उत्तर देण्याची वेळ आली आहे, आणि तेही आम्ही पूर्ण ताकदीने देवू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. 
   पारनेर तालुक्यातील वासूंदे या गावात साडेचार कोटी रुपयांच्या जलजीवन योजनेअंतर्गत नळपाणी पुरवठा योजनेच्या शुभारंभ तसेच शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. 


   यावेळी व्यापीठावर डीसीसी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, सुजित झावरे पाटील, भाजप तालुकाध्यक्ष वसंत चेडे, महिला अध्यक्षा अश्विनी थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.


यावेळी बोलताना ते म्हणाले की मागील तीन वर्षाच्या सत्तेच्या काळात विरोधकांनी सत्तेचा उत्पात माजवला होता. तेव्हा शेतकरी, कष्टकरी, सामान्य माणूस हा बाहेर ताटकळत बसलेला असायचा आणि वाळू तस्कर हा आत बसलेला असायचा. आता परिस्थिती बदलली , कारण आता आपल्या माणसांचे हक्काचे सरकार राज्यात आले, तेव्हा सगळेच बदले असे सांगताना वाळू तस्करी पूर्ण बंद करून आपल्या पालकमंत्र्यांनी वाळू लिलाव पूर्ण बंद करण्याचा निर्णय घेतला, आता आपल्याला एक हजार रुपये ब्रास वाळू मिळणार आहे. एवढंच नाही तर शिंदे-फडणवीस सरकारने पंतप्रधान आवास योजनतून बांधण्यात येणाऱ्या घरासाठी पाच ब्रास वाळू ही मोफत देण्याचे जाहीर केल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. 
   परिवर्तनाची नांदी आता सुरू झाली असून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपद निवडणुकीत हे आपण करून दाखवले आहे असे सांगताना ते म्हणाले की सत्ता मिळत नाही ती हिसकून घ्यावी लागते असे सांगितले. पारनेर तालुक्यातील वासुंदे येथे शेळी मेंढी पालन सहकार महामंडळाचे तालुका कार्यालय होईल असे जाहीर करून येणाऱ्या बाजार समिती निवडणुकीत भाजपला साथ देण्याचे याप्रसंगी आवाहन केले. पारनेर तालुक्यासाठी दहा कोटी रुपयाचा निधी हा देवू असे  आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. 


  यावेळी शिवाजीराव कर्डिले,सुजित झावरे पाटील यांचे समयोचीत भाषणे झाली. 
  या मेळाव्यात पारनेर तालुक्यातील अनेक गावाच्या सरपंचांनी भाजप मध्ये प्रवेश केला. 
या मेळाव्यात पारनेर तालुक्यातील शेतकरी,भाजप पदाधिकारी, नेते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या