दारू पिऊन साक्ष देणाऱ्यावर केली 'ही' कारवाई



दारु पिऊन साक्ष दिली; संगमनेर न्यायालयाने साक्षीदारावर केली ‘ही’ कारवाई


वैद्यकीय तपासणीतही दारू पिल्याचे निष्पन्न


प्रतिनिधी राष्ट्र सह्याद्री
संगमनेर:


दारु पिऊन न्यायालयात साक्ष देणे साक्षीदाराला चांगलेच महागात पडले आहे. दारुच्या अंमलाखाली साक्ष देणाऱ्या साक्षीदाराविरोधात न्यायालयाच्या आदेशावरुन शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमनाथ देमाजी चत्तर असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नांव आहे.


४ थे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर एका नियमीत फौजदारी खटल्याची सुनावणी सुरु होती. या खटल्यामध्ये सोमनाथ देमाजी चत्तर (वय ४९ वर्षे, रा. नान्नजदुमाला ता. संगमनेर) यांची साक्ष सुरु होती. साक्षीदरम्यान सोमनाथ चत्तर हे दारुच्या अंमलाखाली साक्ष देत असल्याचे आरोपीच्या वकीलांच्या लक्षात आल्याने त्यांनी साक्षीदारावर आक्षेप घेतला.
त्यामुळे आरोपीच्या वकीलांच्या आक्षेपावरुन साक्षीदार सोमनाथ चत्तर याची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयात साक्षीदाराची वैद्यकीय तपासणी केली असता चत्तर याने दारुचे सेवन केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे चत्तर याने दारुच्या अंमलाखाली साक्ष दिली म्हणून चत्तर याच्याविरोधात शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.


संगमनेर दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे सहाय्यक अधीक्षक मेहमुद बिबन खान यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, साक्षीदार सोमनाथ चत्तर याने दारुचे सेवन करुन दारुच्या अंमलाखाली मा. न्यायालयात साक्षीकामी हजर राहुन गैरशिस्तीचे वर्तन केले. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशावरुन चत्तर याच्याविरोधात फिर्याद देत असल्याचे म्हटले आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी घनवट करीत आहेत.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या