Jadutona: कोर्टाच्या आवारात चक्क वकिलावर जादूटोणा..!

 विरोधी वकिलाची बोलती बंद करा.... आरोपीने मांत्रिकाला पाठविला संदेश




धुळे :  विरोधी पक्षकाराच्या वकिलांनी आपल्याविरुद्ध अधिक बोलू नये, तसेच त्यांची बोलती बंद करावी यासाठी दुसऱ्या पक्षकाराने नाशिकच्या एका मांत्रिकाची मदत घेत संबंधित वकिलावर जादूटोणा करण्याचा प्रकार समोर आला. वकिलाचा मोबाईल मध्ये फोटो काढून तो नाशिकच्या मांत्रिकाला पाठवल्याचे पोलीस तपासात सिद्ध झाले आहे. याप्रकरणी गुन्हा देखील दाखल झालेला आहे. 

धुळे न्यायालयाच्या आवारात हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, संशयित अटकेत आहे. येथील जिल्हा न्यायालयात निसार शेख अमिर खाटीकविरुद्ध पंढरीनाथ भिला पाटील असा दिवाणी खटला २०१६ पासून सुरू आहे. पंढरीनाथ पाटील यांच्याकडून अ‍ॅड. श्‍यामकांत पाटील (रा. गरुड कॉलनी, देवपूर) कामकाज पाहत आहेत. सध्या धुळे न्यायालयात या खटल्यावर युक्तिवादाचे कामकाज सुरू आहे. ९ मार्चला दुपारी धुळे न्यायालयाच्या आवारात नासिर शेख याने मोबाईलमध्ये अ‍ॅड. श्‍यामकांत पाटील यांचा फोटो काढला.तो नाशिक येथील एका कथित मांत्रिकाला पाठविला. त्या फोटोद्वारे अ‍ॅड. पाटील यांच्यावर जादूटोणा करून आपल्याविरोधात त्यांनी जास्त बोलू नये, तसेच त्यांची बोलती बंद करावी, असा संदेश त्या मांत्रिकाला मोबाईलवरून पाठविला.

अ‍ॅड. पाटील यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तत्काळ न्यायालयाच्या परवानगीने नासिर शेख याचा मोबाईल ताब्यात घेतला. त्यात अ‍ॅड. पाटील व पक्षकार पंढरीनाथ पाटील या दोघांचे फोटो आढळले. तसेच कथित मांत्रिकाशी झालेले संभाषण व संदेशही मोबाईलमध्ये मिळून आले.या प्रकरणी संशयित नासिर शेख याला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले व त्याच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणी संबंधित मांत्रिकालाही तपासासाठी येथे बोलविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.



"धुळे न्यायालय आवारात अ‍ॅड. श्‍यामकांत पाटील पक्षकारासोबत उभे असताना त्यांचा नासिर शेख याने त्याच्या मोबाईलमध्ये फोटो घेतला. व्हॉट्सअ‍ॅपद्वारे नाशिकच्या एका मांत्रिकाला पाठविला. त्यातून अ‍ॅड. पाटील यांनी आपल्याविरुद्ध जास्त बोलू नये यासाठी जादूटोणा करावा, असे त्या मांत्रिकासोबत नासिर शेख याचे संभाषण झाले आहे. ते संभाषण मिळाले आहे. त्यामुळे गुन्हा दाखल केला असून, संशयित नासिरला ताब्यात घेतले आहे."


 -आनंद कोकरे, पोलिस निरीक्षक, धुळे शहर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या