बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाला कोकणचा विरोध
सिंधुदुर्ग : कोकणातील नानार प्रकल्पानंतर आता बारसू येथे होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाला मोठा विरोध होत आहे. सत्ताधारी भाजप आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटामध्ये यावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडू लागल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळात पंतप्रधानांकडे पत्राद्वारे पाठपुरावा करून बारसू येथे रिफायनरी प्रकल्पाची मागणी केली होती असा खुलासा भाजपने केला आहे. तर आम्ही केवळ जागा सुचवली होती मात्र स्थानिक रहिवाशांना विचारात घेऊनच निर्णय घ्यावा, असे ठाकरे गटाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
कोकण हा निसर्ग समृद्ध प्रदेश. समुद्रकिनारी डोंगर घाट आणि प्रचंड मोठी जंगलसंपदा असल्याने पर्यटन विकासाला येथे मोठी संधी आहे. पर्यटनावर काम करणे सोडून उद्योगासाठी अवघड असलेल्या या प्रदेशात रिफायनरी उद्योग आणणे गैर असल्याचे मत बहुतेक कोकणी माणसांचे आहे. कोकणातील निसर्ग जपावा, महाराष्ट्र तसेच देशातून व जगभरातून कोकणात पर्यटक यावेत, यासाठी शासनाने प्रयत्न करायला हवेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
अशात बारसू येथे रिफायनरी प्रकल्पासाठी जागेची मोजणी सुरू झाली. ही मोजणी करू नये म्हणून त्या परिसरातील नागरिकांनी उद्योजक, शासकीय अधिकारी, पोलीस व संबंधित यंत्रणेला अडवले. प्रशासन मात्र विरोध जूमानायला तयार नाही. सामान्य नागरिकच काय पण पत्रकारांनाही बाजूला सारून मोजणीची कार्यवाही सुरू करण्यात आली. यावरून मोठे वादळ उठले. सोशल मीडियात मत मतांतरे झडू लागली.
कोकणातील पत्रकार शैलजा जोगल यांनी शासनाच्या बारसू येथे रिफायनरी उद्योग आणण्याच्या भूमिकेला तीव्र विरोध केला आहे. कोकणात रिफायनरी उद्योग आणण्याचा प्रयत्न करणाऱ्याचा पराभव होतो हा इतिहास आहे, असा इशाराच त्यांनी सरकारला दिला आहे. जोगल यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, "कोकणातला शेतकरी, बागायतदार सरकारकडे मदतीची भिक मागत नाही. ना कधी कर्जामुळे आत्महत्या केली. अवकाळी पाऊस असो, पूर असो, किंवा वादळ आजपर्यंत झालेल्या नुकसानीची मदत आतापर्यंत कोणत्याच सरकारच्या काळात कोकणी माणसापर्यंत पोहोचली नाही. कोकण रेल्वेत ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना आजपर्यंत मोबदला मिळाला नाही. वेगवेगळी सरकारं आली आणि गेली. सगळे एकाच माळेचे मणी. फक्त राजकारण करणारे. या जमिनी आमच्या कोकणातल्या शेतकऱ्याच्या आहेत. इकडचे निर्णय पण आम्हीच घेणार. तुम्ही तुरुंगात टाका किंवा जीव घ्या, हा प्रकल्प होणार नाही. ! आम्ही कोकणी माणसं तसं कुणाच्या वाकड्यात जात नाही, पण आमच्या कुणी गेला तर त्याला सोडत पण नाही! आमच्या लोकांना आज जो त्रास झाला त्याची परतफेड निवडणुकांमध्ये व्याजासकट करणार", असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. जोगल यांचे समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात समर्थन होत आहे. काहींनी शिवसेनेची दुटप्पी भूमिका समोर आणताना 'उद्योगाला विरोध करता, उद्योग महाराष्ट्र बाहेर गेल्यावर पुन्हा रडता', असा देखील विचार मांडला आहे.
________
खारघरची पुनरावृत्ती होऊ नये...
रिफायनरी प्रकल्पाला मोठा विरोध होत आहे. कोकणातील महिला आबालवृद्ध या आंदोलनात सहभागी झाले आहेत. उन्हाची तीव्रता प्रचंड आहे. खारघर मध्ये झालेल्या कार्यक्रमात आपण अनेकांना गमावले. आता कोकणात बारसू येथे त्याची पुनरावृत्ती होऊ नये.
- अजित पवार, विरोधी पक्षनेते : विधानसभा
__________
ह्याला म्हणतात दुटप्पीपणा...
इकडे रिफायनरी व्हावी म्हणून पत्र पंतप्रधानांना लिहायचं. दुसरीकडे रिफायनरी नको म्हणायची. समृध्दी महामार्गाच्या कामात पण हेच घडलं. ठाकरे नेहमी दुटप्पी भूमिका घेतात.
- उदय सामंत, उद्योगमंत्री
- ___________
सरकारचा येवढा अट्टहास का?
उद्योगमंत्री यांनी पत्रकार परिषदे घेऊन विरोध का करत आहे सांगत आहे, उद्योग येत आहे तर येउद्या सांगता मग हाच प्रकल्प गुजरात राज्याला का नको विनाशकारी आहे म्हणून तो तिथे जात नाही ना? आपले विनाशकारी नेते आपलेच कोंकण संपवायला निघाले.
- योगेश देशमुख, नागरिक
- ______________
फायदा असेल तर समजावून सांगा..
आपल कोकण म्हणजे जणू एक स्वर्ग आहे. योग्य त्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. जर तिथे त्या प्रकल्पामुळे दुष्परिणाम होणार असतील तसेच जर या गोष्टींचा लोकांना काही फायदा असेल तर तो त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलून विचारविनिमय करावा व तसे निर्णय घ्यावे.
- दीपक मांडवकर, नागरिक
0 टिप्पण्या