बाजार समिती निवडणूक : यह मेरा गांव है.. और मैं यहां का बाजीराव...

ना. विखे पाटलांनी शक्ती पणाला लावली.. तरीही नगरमध्ये मविआची ताकद दुप्पट

नेत्यांनी आपापले गड राखले..!




नगर : जिल्ह्यातील 14 पैकी सात बाजार समितीचे निकाल लागले. बहुतेक तालुक्यांमध्ये स्थानिक नेत्यांनी विशेषतः साखर कारखानदारांनी आपापले गड राखण्यात यश मिळवले. बाह्य शक्तीचा अंतर्भाव होऊ नये याची सर्वांनीच खबरदारी घेतली. राज्याचे महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री भाजपचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी संपूर्ण शक्ती पणाला लावत जिल्हा पिंजून काढला तरी 'यह मेरा गांव है और मैं यहां का बाजीराव..' अशा ऐटीत प्रत्येक तालुक्यातील कारखानदारांनी आपापले वर्चस्व सिद्ध केले.


नगर जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये चुरस असली तरी जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या महत्त्वाच्या अहमदनगर बाजार समितीकडे जिल्हा सह राज्याचे लक्ष लागले होते. शहरातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शक्ती पणाला लावली असताना या बाजार समितीवर चौथ्यांदा निर्विवाद वर्चस्व मिळविण्यात भाजपच्या माजी मंत्री व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्या गटाला यश आले. सर्वच्या सर्व 18 जागा जिंकत त्यांनी विरोधकांना नामोहरम केले. त्याव्यतिरिक्त आमदार मोनिका राजळे यांनी पाथर्डी बाजार समिती ताब्यात घेत राष्ट्रवादीला धक्का दिला. 

नगर आणि पाथर्डी वगळता जिल्ह्यात कुठेही भाजपला स्पष्ट कौल मिळाला नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीचे ताकद दुप्पट असल्याचे सिद्ध झाले. राहुरीमध्ये राष्ट्रवादीचे आ. प्राजक्त तनपुरे, संगमनेरमध्ये माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात, पारनेरमध्ये राष्ट्रवादीचे आ. निलेश लंके व माजी आ. विजय औटी यांनी आपापल्या सत्ता राखल्या. श्रीगोंद्यात राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप यांनी आ. बबनराव पाचपुते आणि राजेंद्र नागवडे यांच्याकडील सत्ता हिस्कावली. कर्जतकरांनी राष्ट्रवादीचे आ. पवार आणि भाजप आ. शिंदे दोन्ही गटांना समान जागा निवडून देत सत्तेचा समतोल राखला. 

सात बाजार समितीचे निकाल हाती आले. उद्या आणखी सात निवडणुका आहेत. त्यांचाही कौल यापेक्षा फार वेगळा असेल असे वाटत नाही. शेतकऱ्यांना निवडणूक लढविण्याचा अधिकार मिळाला असला तरी मताधिकार नसल्याने तशी ही नियंत्रित निवडणूक ठरली. राजकारणात 'जिसकी लाठी उसकी भैस' म्हण प्रचलित आहे. तालुक्यातील ग्रामपंचायती ज्या गटाच्या ताब्यात सर्वाधिक असतील त्यांचा विजय ठरलेला असतो. बाकी निवडणुकीची औपचारिकता ठरते. 

जिल्ह्यात निकाल जाहीर झालेल्या बाजार समित्यांमध्ये सात पैकी चार ठिकाणी महाविकास आघाडीने वर्चस्व सिद्ध केले असून दोन ठिकाणी भाजपला सत्ता मिळाली आहे. कर्जत मध्ये समसमान जागा जिंकल्याने राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये फोडाफोडीच्या राजकारणाला वेग येणार हे वेगळे सांगायला नको...!



बाजार समित्यांच्या निवडणूक विश्लेषणासाठी वाचा दैनिक राष्ट्र सह्याद्री... 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या