Breaking News : वाक म्हंटले की वाकायचे ही महाराष्ट्राची परंपरा नाही...

माजीमंत्री आ. प्राजक्त तनपुरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला सुनावले..!



 राहुरी : पंतप्रधान मोदी यांच्या सिल्वासा येथील भव्य रोड शो साठी महाराष्ट्रातून ७०० बसेस पाठविण्याचे ' आदेश ' वरून देण्यात आले आहेत. वरून आलेल्या आदेशांना ओंजळीत झेलण्याची जणू शिंदे - फडणवीस सरकारला सवयच झाली आहे, अशी टीका महाराष्ट्राचे माजी ऊर्जा राज्यमंत्री आमदार प्राजक्ता तनपुरे यांनी केली. 

तनपुरे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून सरकारवर टीकास्त्र सोडले. त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांना पोहोचणारी लालपरी, लाखो लोकांना दररोज त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचविते. आजपासून तब्बल ७०० गाड्यांची कमतरता निर्माण झाल्यामुळे लोकांचे हाल झाले आहेत. बस स्थानकावर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. इंजिनिअरिंग आणि इतर काही पदवी शिक्षणाच्या परीक्षा अद्याप सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यात सुट्टीत मामाच्या गावाला जाणाऱ्या लहानग्यांच्या हिरमोड झाला आहे.



प्रत्येक सोहळे ग्रँड करायचे, करोडो रुपयांचा चुराडा करायचा, लोकांना पैसे देऊन गर्दी जमवायची... यांची प्रसिद्धीची हाव कमी होणार तरी कधी? नुकतंच खारघर येथे अव्यवस्थेमुळे निष्पाप लोकांचा बळी गेला. याचे तरी भान ठेवायला हवे होत. वाक म्हंटले की वाकायचे ही महाराष्ट्राची परंपरा नाही याची जाणीव राज्य सरकारने ठेवावी, असा सल्ला त्यांनी दिला आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या