भोर:
तालुक्यातील भोंगवली येथे वीर पत्नी विजया नवनाथ भांडे यांना जयहिंद फाउंडेशनच्या वतीने सौभाग्याचे लेणे बहाल करण्यात आले.पतीच्या प्रथम वर्ष श्राध्द दिनाचे (दि.२३) औचित्याने समारंभपूर्वक विजया यांना कुंकू लावून साडी, चोळी, बांगड्या देण्यात आल्या.
भोंगवली येथील सी आर पी एफ जवान नवनाथ शंकर भांडे यांना रायपूर (छत्तीसगड) येथे दि.३जून २०२२ रोजी वीरगती प्राप्त झाली.दि.२३ मे २०२३ रोजी त्यांचे प्रथम वर्ष श्राद्ध होते.याच दिवसाचे औचित्य साधून वीर पत्नी सौ.विजया नवनाथ भांडे यांचे सौभाग्य लेणे त्यांना सन्मान पूर्वक देण्याचे कार्य जयहिंद फौंडेशनच्या सभासदांनी केले.कार्यक्रमासाठी भोंगवलीचे सरपंच अरुण पवार, ग्रामपंचायत सदस्य मंदा कुंभार, ग्रामस्थ व पाहुणे मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी उपस्थित महिला व पुरुषांच्या मान्यतेने वीर पत्नी सौ. विजया ताईंना हळद - कुंकू लावण्यात आले.हिरव्या बांगड्या भरण्यात आल्या.जोडवी घातली.केसात गजरे व गळ्यात मंगळसूत्र घालण्यात आले.साडी देवून ओटी भरण्यात आली.कार्यक्रमाला आलेल्या सर्व महिलांना वीर पत्नीने हळद - कुंकू लावले.याच पद्धतीने वीर माता पार्वती भांडे यांना हळद - कुंकूचा मान दिला. स्नेहलता जगताप यांनी साडी - चोळी देवून ओटी भरली. वीर पुत्र राज यास सन्मान पत्र, शाल - श्रीफळ देऊन,प्रा. सचिन तावरे लिखित शहीदगाथा पुस्तकाची प्रत देण्यात आली. विधवा स्त्रियांना समाजात मानाचे स्थान मिळावे तसेच विधवा प्रथा मुक्तीसाठी सौभाग्य लेणं बहाल केल्याचे जयहिंदच्या स्नेहलता जगताप म्हणाल्या. यावेळी जयहिंद फौंडेशनचे विजया तावरे,प्रीती बैलकर भोर तालुका अध्यक्ष व संपर्कप्रमुख ज्ञानेश्वर बैलकर सरपंच अरुण जगताप उपस्थित होते.
0 टिप्पण्या