अटकेच्या भीतीने डॉ. मोरे फरार; अटकेसाठी पोलीस पथके रवाना
समीर शेख l राष्ट्र सह्याद्री
जामखेड :
जामखेडच्या रत्नदीप मेडीकल फौंन्डेशन ॲण्ड रिसर्च सेंटरच्या मेडिकल कॉलेजमध्ये बी.फार्म.सी. प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या लैगिक शोषण प्रकरणी डॉ.भास्कर मोरेचा अटकपूर्व जामीन श्रीगोंदा जिल्हा न्यायालयाने फेटाळला. अटकेच्या भितीने मोरे फरार झाला आहे.
जामखेड येथील रत्नदीप मेडिकल फौंडेशनच्या मेडिकल कॉलेजच्या बी. फार्मसी मध्ये शिकत असलेल्या एका विद्यार्थींनींचा लैगिक शोषण केल्या प्रकरणी संस्था चालक भास्कर मोरेवर जामखेड पोलीस स्टेशनला दि. ४ मे रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन दिवसांनंतर मोरेच्या काॅलेजवर वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेशपुर्व प्रवेशासाठीची स्पर्धा परिक्षेचे कारण दाखवत मोरेने श्रीगोंदा सत्र न्यायालयापुढे तात्पुरत्या जामीन साठी अर्ज दाखल केला व त्यास तात्पुरता जामीन मिळालाही.
डॉ. मोरे याने तात्पुरता जमीन मिळवताना नीट परीक्षेचा आधार घेत कोर्टाला खोटी माहिती पुरवली. संस्था अध्यक्ष व नीट परीक्षा याचा काही संबंध नसतो. तरी तात्पुरता जामीन मिळाला कारण तेव्हा पोलिसांनी सक्षमपणे बाजू मांडली नाही.
पीडित मुलीच्या वतीने दि. 24 मे रोजी वकीलाने सक्षम बाजू मांडली. म्हणून न्यायालायाची दिशाभूल लक्षात आली.
जामखेड तालुक्यातील समाजिक संघटनांनी पोलिसांवर दबाव वाढवला व रस्त्यावर उतरले त्यामुळे पोलिसांवर दबाव वाढला व पोलिसांनी सक्षम बाजू मांडली. दरम्यान, मागील तारखेला पीडित मुलीने स्वतः उपस्थित राहून शपथपत्र दाखल केले.
जामखेड पोलीसांनी केलेल्या जबाब, पंचनामे तसेच आवश्यक योग्य कार्यवाहीमुळे आज दि. २९ रोजी भास्कर मोरेचा जामीन न्यायालयाकडून फेटाळला असल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे.
डाॅ. भास्कर मोरे विरूद्ध दाखल विनयभंगाच्या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिलराव भारती हे करत असून पोलीस नाईक अजय साठे हे त्यांना सहकार्य करत आहेत.
दरम्यान भास्कर मोरेवर कठोर कारवाई व्हावी यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी सदर मुलीला योग्य ते सहकार्य करत खर्डा चौकात तीव्र निदर्शने व अंदोलने व जामखेड तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता.
कारवाईसाठी संघटना सरसावल्या...
मुलीने दाखल केलेल्या लैगिक शोषण गुन्हा प्रकरणी त्याच्यावर कठोर कारवाई करावी तसेच काॅलेज मधील मुलामुलींची विविध पध्दतीने केलेली पिळवणूक व शासनाची दिशाभूल करून विविध शाखांना मिळविलेल्या परवानग्यांसह संस्थेत चालणाऱ्या गैरप्रकाराची चौकशी करून डॉ. मोरे विरूद्ध कठोर कारवाई करावी, यासाठी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालया समोर महाराष्ट्र दलित परिषदे मार्फत संजय जाधव यांनी उपोषण केले.
दि. २३ मे रोजी जामखेड येथिल खर्डा चौक येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष आण्णासाहेब सावंत व राष्ट्रीय समाज पक्षाचे अहमदनगर युवा जिल्हा अध्यक्ष विकास मासाळ यांच्या नेतृत्वाखाली संभाजी ब्रिगेड व राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. तर दि. २९ रोजी वंचीत बहुजन आघाडीचे आतिश पारवे यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
0 टिप्पण्या