जून महिना सुरु झाला की, सर्वजण पावसाची आतुरतेनं वाट पाहू लागतात. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. महाराष्ट्रात 10 जूनला मान्सून दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. उन्हाच्या झळांपासून कधी सुटका मिळणार याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशात उकाडा वाढल्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे आता सगळ्यांनाच पावसाची प्रतीक्षा लागली आहे. मान्सून सध्या अंदमान आणि निकोबार बेटांपर्यत पोहोचला आहे.
दक्षिण
अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरातील दक्षिण भाग तसेच अंदमान आणि निकोबार बेटांपर्यत पोहोचलेल्या र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास संथ गतीनं सुरु आहे. मान्सून 4 जूनला केरळमध्ये दाखल होणार आहे. गेल्या दोन दिवसांत मोसमी वारे दक्षिण अरबी समुद्राच्या काही भागासह बंगालच्या उपसागरातील दक्षिण भागात पोहोचले आहेत. त्यासोबत मौसमी वाऱ्यांनी अंदमान निकोबार बेटांचा उर्वरित भाग आणि श्रीलंका, मालदीव, कोमोरीनचा बरासचा भाग व्यापला आहे. त्यामुळे आज मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्रात 10 जूनला मान्सून दाखल होण्याची शक्यता
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून आता वेगाने पुढे सरकत आहे, त्यामुळे हवामानात सातत्याने बदल होत आहेत. त्यामुळे कधी पाऊस पडतो तर कधी कडक ऊन पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात 10 जूनला मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता पुढच्या आठवड्यात राज्यात पाऊस सुरु होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
0 टिप्पण्या