येत्या 36 तासात बिपरजॉय चक्रीवादळ आणखी तीव्र होणार, महाराष्ट्रासह चार राज्यांना सतर्कतेचा इशारा


मुंबई  -  'बिपरजॉय' चक्रीवादळाचा भारतात प्रभाव दिसून येत आहे. 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहे. त्यामुळं चार राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ हे येत्या 36 तासात आणखी तीव्र होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन दिवसांत ते उत्तर आणि उत्तर-पश्चिम दिशेने सरकेल. या पार्श्वभूमीवर मच्छिमारांनी अरबी समुद्रात जाऊ नये, असा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.

बिपरजॉय चक्रीवादळ हे भारताच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे. त्याचा परिणाम गुजरातमध्ये दिसू लागला आहे. गुजरातमधील वलसाडमध्ये समुद्र किनाऱ्यावर जोरदार लाटा उसळत आहेत. याशिवाय गुजरातमधील सुरतमध्येही वादळाचा प्रभाव दिसून येत आहे. डुमास आणि सुवलीमध्ये उंच लाटा उसळत आहेत. त्यामुळं १४ जूनपर्यंत किनारी भाग बंद करण्यात आला आहे. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी बॅनर पोस्टर्स फाटले आहेत. खबरदारी म्हणून पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर मच्छीमारांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

बिपरजॉयचा प्रभाव येत्या ३६ तासांत देशातील चार राज्यांमध्ये दिसण्याची शक्यता आहे. दक्षिण अरबी समुद्राच्या आसपासच्या भागात 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि गुजरात या चार राज्यांमध्ये दक्षता घेण्यात येत आहे. त्यामुळे केरळ, कर्नाटक आणि लक्षद्वीपच्या किनारपट्टीपासून मच्छिमारांना दूर राहण्याचा सल्ला भारतीय हवामान खात्याने दिला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार  बिपरजॉय चक्रीवादळ हे पुढील 36 तासांत आणखी तीव्र होणार आहे. पुढील दोन दिवसांत ते उत्तर आणि उत्तर-पश्चिम दिशेने सरकेल.

या चक्रीवादळाचा परिणाम भारत, ओमान, इराण आणि पाकिस्तानसह अरबी समुद्राला लागून असलेल्या देशांवर होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ आता पूर्व-मध्य अरबी समुद्रातून हळूहळू उत्तर आणि वायव्येकडे सरकत आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार या वादळामुळे ताशी 135 ते 145 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. याचा परिणाम किनारी भागात होऊ शकतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या