मोटार सुरू करायला गेला अन् विहिरीवर चिमुकली निषिधा तरंगताना दिसली

 महिलेसह तीन चिमुकल्यांचा मृतदेह विहिरीत आढळला.

 आत्महत्या की घातपात?राष्ट्र सह्याद्री

पाथर्डी  : 

पोल्ट्रीफार्मवर काम करणार्‍या मजूर कुटुंबीयांच्या घरातील चौघांचे मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. पाथर्डी तालुक्यातील माळीबाभुळगाव परिसरात गुरुवारी ही घटना उघडकीस आली.

दरम्यान, पोलिसांनी महिलेच्या पतीला ताब्यात घेतले आहे. कांचन धम्मपाल सांगडे (वय 26), निखील धम्मपाल सांगडे (वय 6), संचिता धम्मपाल सांगडे (वय 4) आणि निषीधा धम्मपाल सांगडे (वय दीड) अशी मृत चौघांची नावे आहे. मृत सर्व नांदेड येथील करोडी (ता.हातगाव) येथील आहेत.

दीपक गोळक यांचा माळीबाभुळगाव शिवारात पोल्ट्रीफार्म आहे. त्या शेजारीच असलेल्या विहिरीत हे मृतदेह आढळून आले. एसपी राकेश ओला यांनीही घटनास्थळी भेट पाहणी केली. पोलिसांनी मृत महिलेचा पती धम्मपाल सांगडे (वय 30) याला ताब्यात घेतली आहे. धम्मपाल हा पत्नी कांचन व एक मुलगा, दोन मुली यांच्यासह दिपक गोळक यांच्या पोल्ट्रीफार्मवर मजुरीने काम करीत होता. मृत चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

पाथर्डी पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. माळीबाभुळगाव परिसरातील फ्लाईंगबर्ड शाळेच्या पाठीमागे गोळक यांचा पोल्ट्रीफार्मचा उद्योग आहे. तेथे पाच कुटुंबासह इतर पाच जण राहतात. धम्मपाल सांगडे हे कुटुंब त्यापैंकीच एक. दीड वर्षाच्या निषीधाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. त्यानंतर विहिरीतील पाणी उपसा केला असता इतर तिघांचे मृतदेह आढळले. ही आत्महत्या की हत्या? यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

नवरा-बायकोत वाद

धम्मपाल याचे पत्नी कांचन हिच्याशी बुधवारी रात्री वाद झाले. इतरांनी मध्यस्थी करून तो वाद मिटविला. झोपल्यानंतर पुन्हा नवरा-बायकोत वाद झाल्याचे समजते. गुरुवारी सकाळी पोल्टीफार्मवर काम करणारा एक जण विहिरीवर मोटार सुरू करायला गेला असता त्याला दीड वर्षाच्या निषीधाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. त्याने ही माहिती पोल्ट्रीफार्मचे चालक दीपक गोळक यांना दिली. गोळक यांनी पोलिसांना कळविले. पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, रामेश्वर कायंदे, सचिन लिमकर, सुरेश बाबर, कृष्णा बडे, राजेंद्र सुद्रुक असे पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहचले. विहिरीतील पाणी वीजपंपाने उपसा केल्यानंतर इतर तिघांचे मृतदेह दिसून आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या