४५० रुपयांसाठी मजूरांना केले 'गुलाम'



अमानुषपणे लोखंडी साखळीने बांधले मजुरांना, 

धाराशीव : 

विहिरीतून गाळ काढण्याच्या नावाखाली काही मजुरांना विविध भागांतून आणून त्यांना एखाद्या गुलामाप्रमाणे विहिरीचे काम केल्यानंतर रात्री लोखंडी साखळीने जखडून ठेवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ढोकी (जि. धाराशिव) पोलिसांनी ११ बंदीवान मजुरांची सुटका केली. सुटका झालेले मजूर नगर, छत्रपती संभाजीनगर, वाशीम, हिंगोली, जालना, बुलडाणा व मध्य प्रदेशातील असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी ढोकी पोलिस ठाण्यात सुटका झालेले मडूर संदीप घुकसे (वय २३, रा. कवठा (बु) ता. सेनगाव, जि. हिंगोली) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संदीप मजुरी करण्यासाठी नगर येथे आला होता. दोन जून रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास संदीप आणि त्याचा चुलत भाऊ भगवान घुकसे रेल्वे स्टेशन येथे कामासाठी थांबले होते. या ठिकाणी विशाल नावाची एक व्यक्ती आला. त्याने ‘तुम्हाला साडेचारशे रुपये रोज याप्रमाणे विहिरीवर माल काढण्यासाठी देतो,’ असे सांगितले. कामासाठी घुकसे बंधू तयार झाले. या दोघांसह आणखी तीन जणांना एका रिक्षातून खर्डा टोलनाका येथे घेऊन गेले. या ठिकाणी एका कारमध्ये सगळ्यांना बसविले. सर्वांना खामसवाडी (जि. धाराशीव) येथे आणण्यात आले.

पाच जणांपैकी संदीप, अमोल, प्रणव या तिघांना सोडले. शरद दत्ताराव शिंदे, भारत राठोड या दोघांना सोबत घेतले व दुसरीकडे घेऊन गेले.



तीन जून रोजी सकाळी सहाच्या सुमारास संदीप, अमोल, प्रणव, शरद आणि भारतसह अन्य दोघांना विहिरीत काम करण्यासाठी उतरवण्यात आले. सकाळी दहा वाजता विहिरीतून बाहेर काढले. जेवण केल्यानंतर पुन्हा विहिरीत उतरवले. यानंतर सायंकाळी सात वाजताच विहिरीतून या मजुरांना बाहेर काढण्यात आले. कामानंतर झोपण्यासाठी जात असलेल्या या मजुरांना लोखंडी साखळी आणि कुलूप लावून एका ट्रॅक्टरला बांधले.दुसऱ्या दिवसांपासून ते १७ जूनपर्यंत मजुंराकडून अशाच प्रकारचे काम करवून घेऊन लोखंडी साखळीने मजुरांना बांधून ठेवण्याचा प्रकार सुरू होता. संदीप घुकसे याच्या तक्रारीवरून विशाल, कृष्णा शिंदे, मैना जाधव, किरण जाधव, रणजित बळीराम साबळे, कृष्णा शिंदे याची आई, संतोष जाधव या सात जणांच्या विरोधात मानवतस्करी अधिनियमांतर्गत ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस अधिकारी जगदीश राऊत करीत आहेत. या प्रकरणात अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

घुकसे बंधू दोन जूनपासून कामावर गेले होते. त्यांची माहिती घरच्यांना मिळत नव्हती. खामसवाडी येथे हे दोघे असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून घुकसे याचे वडील आणि नातेवाइकांनी ढोकी पोलिस ठाण्यात येऊन घटनेची माहिती दिली. ढोकी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जगदीश राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, परजिल्ह्यात विविध भागातून काही मजुरांना वाखरवाडी येथे आणण्यात आले आहे. त्यांना जबरदस्तीने डांबून ठेवण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला.

या माहितीनंतर सहायक पोलिस निरीक्षक जगदीश राऊत, पोलिस उपनिरीक्षक कपिल बुद्धेवार, सहायक फौजदार राजाभाऊ सातपुते, पोलिस अंमलदार शेळके, श्रीमंत क्षीरसागर, राम तरटे, शिंदे आणि गोडगे यांनी विशेष पथक तयार करून वाखरवाडी येथे छापा मारला आणि ११ जणांची सुटका केली.


लोखंडी साखळीने बांधले

विहिरीचे काम करण्यासाठी साडेचारशे रुपये रोज याप्रमाणे मजुरांना आणण्यात आले. त्यांच्याकडून १३ ते १४ तास काम करवून घेण्यात येत होते. काम करीत असताना थकवा आल्याने काही मजूर विश्रांतीसाठी बसल्यावर त्यांना मारहाण करण्यात आली, असा आरोप करण्यात आला आहे. मजूर पळून जाऊ नये, यासाठी लोखंडी साखळीने त्यांना बांधून ठेवण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या