राजधानी दिल्लीतून पुन्हा एकदा हादरवणारी घटना समोर आली आहे. दिल्लीतील साक्षी हत्याकांडाची घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीतील बेगमपूर येथे एका सनकी तरुणाने एकतर्फी प्रेमातून तरुणीचा गळा कापला. यानंतर त्यानं स्वत: फाशी घेत आत्महत्या केली आहे.
पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार, एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून तरुणीवर गंभीर चाकू हल्ला केला. यानंतर स्वत:ला संपवलं. घटनेची माहिती मिळताच गंभीर जखमी तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तरुणाला वाचवता आलेलं नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि तरुणी दोघेही एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये काम करत होते. एकतर्फी प्रेमात तरुणीचा नकार सहन न झाल्याने तरुणानं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे.
घटना बेगमपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, आरोपीचं नाव अमित असल्याचं सांगितलं जात आहे. अमित आणि तरुणी हे दोघेही रोहिणी सेक्टर 24 मध्ये असलेल्या एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत काम करत होते. ही कंपनी अमितच्या मोठ्या बहिणीची असल्याचं सांगितलं जात आहे. कंपनीत काम करत असतानाच अमितची तरुणीशी ओळख झाल्याचं बोललं जात आहे.
0 टिप्पण्या