चिरंजीवीला कॅन्सर? अभिनेत्याने ट्वीट करत दिली माहिती


दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील मेगास्टार चिरंजीवी  सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते त्यांचं मत मांडत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी चिरंजीवीला कॅन्सरची झाल्याची चर्चा रंगली होती. यामुळे चिरंजीवीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. आता चिरंजीवीने ट्वीट करत कॅन्सरबद्दल भाष्य केलं आहे. 

चिरंजीवीने ट्वीट केलं आहे की,"गेल्या काही दिवसांपूर्वी कॅन्सर सेंटरचं उद्घाटन करताना मी म्हणालो होतो की, कॅन्सरबद्दल जनजागृती करणे आवश्यक आहे. तसेच जर तुम्ही नियमित वैद्यकीय चाचण्या केल्या तर तुमचा बचाव होऊ शकतो. त्यामुळेच मी कोलन स्कोप चाचणी केली. या चाचणीत नॉन-कॅन्सरस पॉलीप्सचं निदान झालं आणि नंतर ते काढण्यात आलं. त्यावेळी मी एवढचं म्हणालो होतो की,त्यावेळी चाचणी केली नसती तर कॅन्सर झाला असता. म्हणूनच प्रत्येकाने सावध राहून चाचणी करुन घेतली पाहिजे". 

चिरंजीवीने पुढे लिहिलं आहे,"माझं बोलणं माध्यमांना नीट समजलं नाही आणि मला कॅन्सर झाला आणि मी कॅन्सरमधून वाचलो, अशा बातम्या व्हायरल झाल्या. अशा खोट्या बातम्यांमुळे लोक घाबरले आणि दुखावले गेले आहेत". 

चिरंजीवीच्या या ट्वीटनंतर चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. चाहते कमेंट्स करत देवाचे आभार मानत आहेत. चिरंजीवीचा 'भोलाशंकर' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमात तो तमन्ना आणि किर्ती सुरेशसोबत झळकणार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या