धमकीनंतर शरद पवारांच्या पुण्यातील घराबाहेरील सुरक्षेत वाढ


मुंबई प्रतिनिधी - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार  यांना ट्विटरवरुन जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या पुण्यातील घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 'राजकारण महाराष्ट्राचे' असं या ट्विटर हँडलचं नाव आहे. हे हँडल कुठली व्यक्ती चालवते, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र या प्रकरणाचं गांभीर्य पाहून लगेचच मोठा पोलीस फाटा त्यांच्या घराबाहेर आणि मोदी बाग परिसरात तैनात करण्यात आला आहे. 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तुमचा दाभोळकर होणार, असं या ट्वीटमध्ये लिहिलं आहे. त्यांच्या जीवाला धोका असल्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी या ट्विटर हँडलवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शरद पवारांना काही झाल्यास त्या सगळ्याला राज्य सरकार आणि केंद्र सरकार जबाबदार असणार, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. 

पुण्यातील शरद पवारांच्या घरी अनेक बैठका आणि भेटीगाठी होत असतात. रोज अनेक नागरिक किंवा कामकाजासाठी नेतेमंडळी येत असतात. मात्र आज या कोणालाही या परिसरात येऊ दिलं जात नाही आहे. फक्त राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनाच त्यांच्या घराच्या परिसरात थांबू दिलं जात आहे. घराबाहेर महिला पोलीस देखील तैनात आहेत. शिवाय कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या