बारामतीचा भोंदूबाबा पारनेरमध्ये जेरबंद



काळी जादू, बंदुकीचा धाक दाखवून लैंगिक शोषण!


 साडेपाच लाखांची फसवणूक



दत्ता गाडगे l राष्ट्र सह्याद्री


पारनेर : 


मेंढ्या मारणार नाहीत, आजार दूर करतो, पैशाचा पाऊस पाडतो, अशी आमिषे दाखवत बारामतीच्या भोंदू बाबाने तब्बल साडेपाच लाख रुपयांची फसवणूक करत लैंगिक शोषण केल्याचा प्रकार पारनेर तालुक्यात उघडकीस आला आहे. या भोंदू बाबाने पीडित कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.  पीडित कुटुंबाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी योगी महादेवनाथ बाबा उर्फ ज्ञानदेव तुकाराम कांबळे (वय ४२ वर्षे रा- शिर्सुफळ, अटोळेवस्ती, मधलावाडा मराठी शाळेजवळ, बारामती जिल्हा-पुणे) याला अटक केली आहे.

पारनेर पोलीस स्टेशन हद्दीत काळ्या जादूचा वापर करून लोकांचे आर्थिक व लैंगीक शोषण करून फसवणूक करणारे लोक फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळाली होती.

२१ जून रोजी पारनेर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील एका कुटुंबाला योगी महादेवनाथ बाबा नावाचे एक भोंदू बाबाने तो देवऋशी असल्याचे भासवतो. त्याने पीडित कुटुंबाच्या अडचणींचे निवारण करण्यासाठी होम हवन करण्याचे नाटक केले. त्या बदल्यात आर्थिक लुबाडणूक करताना त्यांच्या कुटुंबातील मुलीवर लैंगिक अत्याचार केले. त्यावरून सदर कुटुंबाची माहिती घेऊन विचारपूस करत असताना सदर भयभीत झालेले कुटुंब पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी घाबरत होते. परंतू त्यांना पोलिसांनी विश्वासात घेऊन त्यांना विचारपूस केल्यावर त्यांची सदर भोंदू बाबा याने तो देवऋशी असल्याचे भासवून त्यांच्या घरातील मरणाऱ्या मेंढ्या मरू न देण्यासाठी, घरातील लोकांचे आजारपणाचे निवारण करण्यासाठी तसेच मुलीचे आजारपण दूर करण्यासाठी जादूटोणा करून होम हवन केले. त्यांचे घरी पैशांचा पाऊस पाडण्याचे अमिष दाखवून तसेच घरातील मुलीचे आजारपण दूर करण्याची पूजा करण्यासाठी त्याचे व तिचे लग्नात काढतात तसे गळ्यात हार व मंगळसूत्र घालतानाचे फोटो काढण्यास भाग पाडले. त्याद्वारे त्यांना ब्लॅकमेल करून तसेच एअरगनचा धाक दाखवून पीडीतेवर लैंगिक अत्याचार करून तिचे कुटुंबाकडून वरील जादूटोणा करण्यासाठी वेळोवेळी ५ लाख ५० हजार रूपये घेत त्यांचे आर्थिक व लैंगीक शोषन करून फसवणूक केली आहे. 
त्याबाबत पीडीतेच्या फिर्यादीवरून भोंदू बाबा योगी महादेवनाथ बाबा उर्फ ज्ञानदेव तुकाराम कांबळे (वय ४२ वर्षे रा- शिर्सुफळ, अटोळेवस्ती, मधलावाडा मराठी शाळेजवळ, बारामती जिल्हा-पुणे) याचे विरूद्ध पोलिसांनी पारनेर पोलीस नरबळी आणि ईतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध करणे करिता व त्यांचे समुळ उच्चाटन करिता अधिनियम २०१३ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल केला . 
  पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैर, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग,अहमदनगर संपतराव भोसले, यांचे मार्गदर्शनाखाली पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक- हनुमान उगले, सहा फौज, शिवाजी कडूस, पो.हे.कॉ. गणेश डहाळे, जालींदर लोंढे, पो.ना. गहिणीनाथ यादव, पो. कॉ. सुरज कदम, अनिल रोकडे, मयुर तोरडमल, सारंग वाघ, सागर धुमाळ व विवेक दळवी व पथकाने ही कारवाई केली.

आजार दूर करण्यासाठी, आर्थिक समस्या मिटवण्यासाठी किंवा इतर लाभ मिळवून देण्याच्या आमिषासाठी कोणी असे आघोरी प्रयोग करत असतील तर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पारनेर पोलिसांच्या वतीने करण्यात आले.


काळी जादू, लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू बाबासह पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड व पोलीस पथक.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या