पैसे मोजताना सीबीआय अधिकाऱ्यांची दमछाक
------
पुणे : पुण्यातील महसूलचे अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल गणपतराव रामोड ( Anil Ramod) यांना आठ लाखांची लाच घेताना शुक्रवारी सीबीआयच्या (CBI) पथकाने रंगेहाथ पकडले. त्यानंतर अनिल रामोड यांच्या पुण्यातील आणि नांदेड येथील घराची सीबीआयने झडती घेतली आहेत. त्यात सीबीआयचे हाती मोठे घबाड लागले आहे. रामोड यांच्या पुण्यातील तीन घरांमध्ये सुमारे तब्बल ६ कोटी रुपयांची रोकड सीबीआयच्या हाती लागली आहे. ही रक्कम मोजण्यासाठी मशीन आणण्यात आले होते. अनेक तासानंतर हे पैसे मोजून झाले आहेत. ही रक्कम जप्त करण्यात आली आहे.
पुण्यातील घरातच १४ स्थावर मालमत्तेची कागदपत्रेही आढळून आली आहेत. रामोड यांच्या बँक खात्याची तपासणी अद्याप बाकी आहे. स्थावर मालमत्ता ही रामोड व त्याच्या कुटुंबियांतील व्यक्तींच्या नावे आहेत.
माळशिरस येथील एका शेतकर्याच्या जमिनीचे भू-संपादन झाले होते. त्याचा मोबदला लवकरात लवकर देण्यासाठी अधिकारी रामोड यांनी 10 लाखांची मागणी होती. तडजोडीत आठ लाख रुपये देण्याचे ठरले. पण या शेतकऱ्याने सीबीआयकडे तक्रारी दिली. त्यानुसार शुक्रवारी लाच घेताना डॉ. रामोड यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
त्यानंतर हा अधिकारी राहत असलेल्या औंध-बाणेर येथील ऋतुपर्ण सोसायटी येथील बंगला व इतर दोन निवासस्थानाची सीबीआयच्या पथकाने झडती घेतली. त्यात सरकारी निवासस्थानामध्ये पैसे आढळून आले आहे. तीन निवासस्थानी तब्बल सहा कोटी रुपये आढळून आले. या अधिकाऱ्याची नांदेड येथील घराची सीबीआयने झडती घेतली आहे.
अनिल रामोड यांना शनिवारी शिवाजीनगर येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहेत. या अधिकाऱ्याची आणखी कुठे संपत्ती आहे का याचा शोध सीबीआयकडून करण्यात येत आहे. तब्बल सहा कोटींची रक्कम व कागदपत्रे पोलिसांनी जप्त केले आहेत.
0 टिप्पण्या