Politics : निवडणुकांसाठी राजकीय मोसमी वारे...

 


मुख्यमंत्री शिंदे यांनी बोलविली शिवसेनेच्या मंत्री आमदारांची तातडीची बैठक



मुंबई: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा जोर धरू लागली आहे. निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसे राजकीय मोसमी वारे वाहू लागले आहेत. प्रत्येक पक्षाने आपापल्या व्युव्हरचना आखायला सुरुवात केली आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांची बैठक बोलावली आहे. शिंदे यांच्या शिवसेनेच्या 5 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असल्याचा दावा काही विरोधी पक्षातील नेत्यांनी केला आहे. परंतु शिवसेना आणि भाजप नेत्यांनी त्याचे खंडण केलं आहे तरी यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.


 दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्वच आमदार, खासदार आणि नेत्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. वरळीच्या एनएससीआय सभागृहामध्ये ही बैठक बोलावण्यात आली आहे.

शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासह विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे, अशी प्राथमिक माहिती देण्यात येत आहे. पण या बैठकीत सध्याच्या राजकीय हालचालींवरही खलबतं होण्याची शक्यता आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी दोन दिवसांपूर्वी शिंदे यांच्या शिवसेनेच्या 5 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असल्याचा दावा केला होता. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीदेखील तसाच दावा केला आहे.शिवसेना आणि भाजपच्या मंत्र्यांनी याबाबतच्या सर्व चर्चांचं खंडन केलं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर मंत्रिमंडळ विस्तार हा मुख्यमंत्री शिंदे यांचा विषय असून त्यात भाजपाने हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच येत नाही, असा खुलासा केला आहे. तरी शिवसेनेच्या गोटात सध्या हालचालींना वेग आला असून या बैठकीत नेमके काय होते याकडे राजकीय विश्लेषकांच्या नजरा लागल्या आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या