विदर्भात 48 तासात पावसाचे 8 बळी, तर 30 नागरिक जखमी

गेल्या तीन चार दिवसांपासून विदर्भातीलअनेक भागात पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळत आहे. दरम्यान गुरुवारी आणि शुक्रवारी देखील विभागात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडतांना पाहायला मिळाले.मागील 48 तासात संपूर्ण विदर्भाला मुसळधार पावसानं अक्षरश: झोडपून काढले आहे. या मुसळधार पावसात वीज पडल्यानं सात जणांचा मृत्यू झाला असून एकाचा भींत कोसळून मृत्यू झाला आहे. तर वेगवेगळ्या ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानं त्यात वाहून गेलेल्या तीन जणांचा अद्यापही शोध लागलेला नाही. तर विदर्भात विविध ठिकाणी वीज पडल्यानं 30 पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत. शुक्रवारी पूर्व विदर्भातील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात वीज पडल्यानं पाच जणांचा मृत्यू तर 32 जण जखमी झालेत. आज सकाळी यवतमाळ येथे भींत कोसळून एकाचा मृत्यू झाला असून गुरुवारी अमरावती इथं वीज पडल्यानं दोघांचा म्हणजे एकूण 8 जणांचा मृत्यू झाला आहे. मधील 48 तासांपासून विदर्भात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. या पुरात वर्धा येथील एक तर अकोला येथील दोन जण वाहून गेल्याची घटना घडली आहे. बचाव पथक या तिघांचाही शोध घेत असून अद्यापही या तिघांचाही शोध लागलेला नाही. चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि गोंदिया जिल्ह्याला हवामान खात्यानं रेड अलर्ट दिला आहे. चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. हा सुट्टीचा आदेश रेड अलर्ट असलेल्या जिल्ह्यात देण्यात आला आहे. सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आहे. आपत्कालीन परिस्थिती आणि कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने निर्णय घेतला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या