Bal Bothe : रेखा जरे हत्याकांडाची सुनावणी सुरू...

 

उलट तपासणीत पहिलाच साक्षीदार गडबडला!
नगर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्ता तसेच यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे खून प्रकरणाची सुनावणी सोमवारी (दि. 3) येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू झाली. न्यायालयाने या हत्याकांडाचे पंच डॉ. बिपिन पायघान यांची पहिली साक्ष नोंदवली. विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांच्या उपस्थितीत साक्षीदाराने न्यायालयाला माहितीही दिली; मात्र उलट तपासणीमध्ये पंचनाम्यातील नोंदीशी जबाब जुळत नसल्याचा दावा मुख्य आरोपी ऋषिकेश पवारचे वकील सुनील मगरे यांनी केला. त्याने पंच डॉ. पायघान गडबडले. मुख्य आरोपी बाळ बोठेसह इतर आरोपींचे वकील गैरहजर असल्याने न्यायालयाने ताशेरे ओढले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 13 जुलै रोजी होणार आहे. 


30 नोव्हेंबर 2020 रोजी नगर पुणे रस्त्यावरील जातेगाव घाटात रेखा जरे यांची कार अडवून हत्या करण्यात आली होती. पत्रकार बाळ बोटे याने सागर भिंगारदिवे यांच्या माध्यमातून सुपारी देऊन ही हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते. याप्रकरणी 11 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला असून बोठेसह सहा आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. सागर भिंगारदिवे, आदित्य चोळके, ज्ञानेश्वर शिंदे, ऋषिकेश पवार व फिरोज शेख अशी त्यांची नावे आहेत. आज न्यायालयात उलट तपासणी घेतलेले मगरे हे ऋषिकेश पवारचे वकील आहेत. हत्याकांडापूर्वी रेकी केल्याचा पवारवर आरोप आहे. 


पत्रकार बोठेचे रेखा जरे यांच्यासोबत प्रेमसंबंध होते. त्यातून त्यांचे वाद झाले. यामुळे बदनामी होण्याच्या भीतीने बोठे याने हा खून घडवून आणल्याचे दोषारोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. हत्याकांडाच्या वेळी रेखा जरे यांच्या समवेत गाडीत बसलेला त्यांचा मुलगा रुणाल प्रत्यक्ष साक्षीदार आहे. 

 

 हत्येनंतर करण्यात आलेल्या पंचनाम्यावर डॉ. बिपिन पायघान यांची सही आहे. आज जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी यांच्यासमोर पायघान यांची साक्ष नोंदविण्यात आली. आरोपीचे वकील सुनील मगरे यांनी उलट तपासणी घेतली. त्यात मृत रेखा जरे यांची उंची पायघान यांनी 160 सेंटीमीटर असल्याचे सांगितले. पंचनाम्यात मात्र 162 सेंटिमीटर उंचीचा उल्लेख आहे. मृताच्या शरीरावर पाच ते सहा इंच जखम असल्याचे आपण पाहिले असे डॉ. बिपिन पायघान यांनी सांगितले. मात्र पंचनाम्यात तशी नोंद नसल्याचे मगरे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. शिवाय पंचनामा पोलीस अधिकारी गडकरी यांनी तयार केलेला होता त्यावर आपण सही केल्याचे पंच डॉ. बिपिन पायघान यांनी सांगितले. त्यावर डॉ. पायघान यांनी पंचनामा न वाचताच सही केल्याचा दावा वकील सुनील मगरे यांनी केला. त्यामुळे जरे हत्याकांडातील पहिल्याच साक्षीदाराची न्यायालयात गडबड झाली. सुनावणीला बोठेसह सहा आरोपी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे तर तनपुरे प्रत्यक्ष हजर होते. पुढील सुनावणी 13 जुलै रोजी होणार आहे. 

 जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि संवेदनशील असलेल्या या खटल्याच्या पहिल्या सुनावणीला सरकारी पक्षाची तयारी कमी असल्याचे दिसून आले. पंचनाम्यातील नोंदणी आणि साक्षीदाराचे कथन यातील तफावतीचा फायदा घेण्याचा प्रयत्न त्यामुळे आरोपीचे वकिल मगरे यांनी केला.

 __________


जिथे हिरो, तिथेच व्हिलन


वाळकी सारख्या ग्रामीण भागातून आलेल्या बाळ बोठेची कारकीर्द अति वेगवान होती. तब्बल 28 वर्ष पत्रकारिता, 8 पुस्तकं प्रकाशित, 3 पुस्तकं प्रकाशनाच्या वाटेवर, नगर जिल्ह्याच्या राजकारणावर पीएचडी, तब्बल 16 विषयांमध्ये मास्टर्स डिग्री, राज्य, राष्ट्रीय पातळीवरचे 40 पुरस्कार, 40 हून अधिक देशांमध्ये भ्रमंती, आलिशान बंगला, जमीन जुमला आणि महागड्या गाड्या... असा कुणालाही हेवा वाटावा अशी देखणी कारकीर्द बाळ बोठे याची होती. जातेगाव घाटाखालील एका बनावट दारू कारखान्याचा भांडाफोड बोठे यांने क्राईम रिपोर्टर असताना केला होता. त्या गुन्ह्यात जिल्ह्यातील अनेक नामवंत लोक अडकले आणि बोठे हिरो ठरला. त्याच जातेगाव घाटात झालेल्या रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी म्हणून नाव पुढे आल्यानंतर बोठेचा उल्लेख व्हिलन म्हणून झाला.


_____


हनी ट्रॅप मालिकेचा संबंध?


रेखा जरे हत्याकांडाच्या काही महिन्यांपूर्वी बोठे याने हनी ट्रॅपची मालिका वृत्तपत्रात सुरु केली होती. त्यातून अनेक मोठमोठ्या राजकीय, सामाजिक, व्यापारी व्यक्तींची नावे समोर आली होती. मात्र ही नावे छापताना त्या व्यक्तीचे नाव कोडमध्ये छापले जायचे, जेणेकरून त्या व्यक्तीपर्यंत हा संदेश पोहोचवला जाईल आणि नंतर समझोता करता येईल. मात्र प्रश्न असा निर्माण होतो की, यासंदर्भात बोठे याला याची माहिती कशी मिळत होती आणि यासंदर्भातील ते मालिका कसे छापत होते, आणि ट्रॅपशी संबंधित काही लोकांचा तर या हत्याकांडात काही संबंध नाही ना? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

_______


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या