आता पोलीसही कंत्राटी

 

आता पोलीसही कंत्राटी ;


 पोलीस दलात 3 हजार पदे भरणारमुंबई : 


मुंबई पोलीस दलात तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह खात्याने घेतला आहे. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीने जास्तीतजास्त ११ महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार असून अशा प्रकारचा हा पहिलाच निर्णय आहे.मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळाची तीव्र टंचाई असल्याने पोलीस आयुक्तांच्या विनंतीवरून गृह विभागाने हा निर्णय घेतला आहे.


 राज्य सरकारी सेवेत कंत्राटी भरतीवरून वाद झाला असतानाच आता पोलीस दलातही कंत्राटी भरती केली जाणार आहे. मुंबई पोलीस दलासाठी शिपाई ते सहाय्यक निरीक्षक यांची ४०,६२३ पदे मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी १० हजार पदे रिक्त असल्याने दैनंदिन कामकाजासाठी मनुष्यबळाची कमतरता आहे.

पोलीस दलात मनुष्यबळाची तीव्र टंचाई आहे. राजकीय नेत्यांच्या संरक्षणामुळे आणखी मनुष्यबळाची गरज आहे. 


दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, रमजान, दिवाळी अशा सणासुदीच्या काळात बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलिसांची गरज भासते. त्यामुळे कंत्राटी पोलीस भरती करण्याचा पोलीस आयुक्तांचा आग्रह होता, असे गृह खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

भरती प्रक्रिया...

राज्य सरकारने २१ जानेवारी
२०२१ रोजी ७,०७६ शिपाई आणि ९९४ वाहनचालकांच्या भरतीला मंजुरी दिली आहे.
ही भरतीप्रक्रिया आणि या शिपायांचे प्रशिक्षण पूर्ण होऊन हे मनुष्यबळ दाखल होण्यास दोन वर्षे लागणार आहेत.
तोपर्यंत कंत्राटी पोलिसांची नियुक्ती ११ महिन्यांसाठी केली जाणार आहे.


बदल्यांमुळे पडली गरज...

संजय पांडे पोलीस आयुक्तपदी असताना त्यांनी तीन ते चार हजार पोलिसांना बदलीवर मुंबईबाहेर जाऊ दिले होते. त्यामुळे मोठी मनुष्यबळ पोकळी निर्माण झाली होती. आताही अनेक पोलिसांची मुंबईबाहेर बदली झाली आहे. त्यांना तेथे रुजू व्हायचे आहे. परंतु मुंबईतील मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे त्यांना जाऊ दिले जात नाही, असे सांगण्यात येते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या