पोलीस निरीक्षकासह तिघे एलसीबीच्या जाळ्यात

 


सहआरोपी न करण्यासाठी तीन लाखांची लाच

 पोलीस निरीक्षकासह तिघे एलसीबीच्या जाळ्यात

जळगाव :

जिल्ह्यात पोलीस दलात लाच घेण्याचे प्रकार दिवसेंदिवस समोर येत आहे. भुसावळ येथे धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी मोठी कारवाई केली आहे. बायोडिझेलच्या प्रकरणात दाखल गुन्ह्यात सहआरोपी न करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी खाजगी पंटर ऋषी शुक्ला, भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह रायटर तुषार पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव एलसीबीच्या टीमने काही दिवसांपूर्वी बायोडिझेलची वाहतूक करणारा टँकर पकडून भुसावळ बाजारपेठ पोलिसांकडे कारवाईसाठी दिला होता. या प्रकरणात दाखल गुन्ह्यात सहआरोपी न करण्याच्या मोबदल्यात ५ लाखांची लाच मागण्यात आली होती. तडजोडीअंती ३ लाखांची लाच देण्याचे निश्चित झाल्यानंतर तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवली होती.

मिळालेल्या तक्रारीनुसार धुळे एसीबीच्या पथकाने मंगळवारी सापळा रचला. त्यानुसार ऋषी शुक्ला याला ३ लाखांची लाच स्वीकारताच अटक करण्यात आली. तर पोलीस निरीक्षक गायकवाड आणि रायटर तुषार पाटील यांच्या सांगण्यावरून व त्यांनीच लाच मागण्यास प्रोत्साहित केल्याचे एसीबीने म्हटले आहे. तर पो.नि. गायकवाड आणि खाजगी पंटर यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

कारवाई नाशिक पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली
धुळे लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधिक्षक अभिषेक पाटील यांच्यासह पो.कॉ. संतोष पावरा, पो.कॉ. रामदास बारेला, पो.कॉ.चालक सुधीर मोरे यांनी केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या