मध्य प्रदेशातून पिस्तुलांची तस्करी....
शिरपूर : मध्यप्रदेशातून तीन पिस्तूल विकत घेऊन श्रीरामपूरकडे नेणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून गावठी बनावटीच्या मॅक्झिनसह तीन पिस्तूल, आठ जिवंत काडतुसे आणि एक कार जप्त करण्यात आली आहे. सईद आस मोहम्मद सय्यद (वय 31, रा. श्रीरामपूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
दरम्यान, मध्य प्रदेशातून होणाऱ्या शस्त्र तस्करीला रोखण्यासाठी आता दोन्ही राज्यातील सीमावर्ती भागातील पोलीस दलाच्या प्रमुखांची बैठक घेण्यात येणार आहे. यानंतर विशेष मोहीम राबवून शस्त्र तयार करणारी यंत्रणा नष्ट केली जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दोन दिवसांपूर्वीच सांगवी पोलिसांनी शस्त्र तस्करी करणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चार बनावट पिस्तूल, सहा मॅक्झिन आणि सात काडतुस जप्त केली होती. आता पुन्हा आणखी एक आरोपी अटक केला आहे.
मध्यप्रदेशातून शिरपूर मार्गे हत्याराची तस्करी होणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सहाय्यक उपनिरीक्षक संदीप पाटील, सुनील वसावे, मंगला पवार, संदीप ठाकरे, संतोष पाटील, योगेश मोरे, संजय भोई यांचे पथक गठीत केले. या पथकाने पाठलाग करून सईद यास अटक केली.
दरम्यान, मध्य प्रदेशातील सीमावर्ती भागातून होणारी हत्याराची तस्करी रोखण्यासाठी यापूर्वी कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले आहे. मात्र त्या दिवशी मध्य प्रदेशात राजकीय नेत्याचा कार्यक्रम असल्यामुळे संबंधित बडे अधिकारी या मोहिमेत सहभागी होऊ शकले नाही. आता दोन्हीही राज्यातील विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक तसेच आणखी संबंधित पोलीस निरीक्षक यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील अधिकारी तसेच मध्य प्रदेशातील देखील सीमावर्ती भागातील पोलीस अधिकारी या बैठकीत सहभागी होणार आहेत. ही बैठक धुळे जिल्ह्याच्या वतीने आयोजित केली जाणार असल्याने तिचे शिरपूर शहरात आयोजन होणार असल्याची शक्यता देखील पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी व्यक्त केली आहे. या बैठकीत यापूर्वी मध्य प्रदेशातील हत्यार तयार करणाऱ्या गावासह अन्य संशयित ठिकाणांवर छापे टाकण्याचे नियोजन केले जाणार आहे. यातून हत्यार तस्करी कायमस्वरूपी रोखण्याची कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे.
0 टिप्पण्या