राज्यात प्रथमच पावसासाठी रेड अलर्ट, कोणत्या शहरांमध्ये कोसळणार अति मुसळधार



पुणे | 18 जुलै 2023 : जुलै महिन्यातील पंधरा दिवस पावसाच्या प्रतिक्षेत गेली. आता उर्वरित कार्यकाळात चांगला पाऊस होईल, अशी स्पष्ट चिन्ह हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राज्यात आता पुढील १२ दिवस पाऊस कायम असणार असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. अरबी समुद्रात झालेल्या बदलांमुळे राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाल्याचे म्हटले आहे. यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांना प्रथमच रेड अलर्ट दिले आहे. तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिले आहे. यामुळे राज्यातील काही भागांना अतिवृष्टी होणार असल्याची शक्यता आहे.

पुणे आणि रायगड जिल्ह्यासाठी १८ रोजी रेड अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. ठाणे, रायगड, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांत १९ रोजी रेड अलर्ट दिला आहे. त्यानंतर राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. पाच दिवस राज्यात चांगलाच पाऊस होणार आहे.

मध्य भारतात पाऊस

पुढील 2 दिवसांमध्ये भारताच्या काही भागांत जोरदार पाऊस होणार आहे. कोकणचा काही भाग, सातारा, पुणे नाशिकचा घाट क्षेत्र आणि किनारी आंध्रचा काही भागात आणि मराठवाड्यातील काही भागांत तुरळक अन् मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. यामुळे राज्यात पाऊस सुरु आहे. ही परिस्थिती पुढील काही दिवस कायम राहणार आहे.

विदर्भात जोरदार

विदर्भात जोरदार पाऊस सुरु आहे. विदर्भात पाऊस सुरु असल्यामुळे धरणसाठा चांगला वाढणार आहे. गडचिरोली शहरासह जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे गडचिरोली नगरपरिषदच पाण्याखाली आली आहे. जोरदार सुरु असलेल्या पावसामुळे सखल भाग जलमय झाला आहे.

राज्यात पावसाने जोर पकडला आहे. यामुळे आता धरणसाठ्यात चांगली वाढ होणार आहे. पावसाळा सुरु होऊन दीड महिना झाल्यानंतर राज्यातील धरणांमध्ये ३० टक्के जलसाठा होता. यामुळे शहरांमध्ये पाणी कपात करण्यासंदर्भात चर्चा होऊ लागली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या