Breaking News : अजितदादांचा भर दुपारी बंडाचा झेंडा

 

  • राष्ट्रवादीच्या 35 आमदारांसह भाजप-सेना सरकारमध्ये दाखल 
  • घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ
  • शरद पवार घेणार पत्रकार परिषद




मुंबई : 2019 च्या निवडणुकीनंतर अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सरकार स्थापण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळचे त्यांचे पहाटेचे बंड अवघ्या काही तासांमध्ये फसले. आता मात्र त्यांनी रविवारचा मुहूर्त सादर भर दुपारी बंडाचा झेंडा फडकवला. राष्ट्रवादीच्या तब्बल 35 आमदारांसह त्यांनी शिंदे फडणवीस सरकार मध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत राज्याला पुन्हा धक्का दिला. 

राष्ट्रवादीच्या नऊ नेत्यांना मंत्रिपद देण्यात आली. त्यात जेष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, आदिती तटकरे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम, संजय बनसोडे, अनिल पाटील यांचा त्यात समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकारला समर्थन देत असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भूमिका मात्र अद्याप पडद्याआड आहे. अजित पवार यांनी विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा देऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. 

 या बंडामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला असून अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आज रविवारी, सकाळपासूनच राजभवनात हालचाल सुरू होती. त्यामुळे अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करून सरकारमध्ये दाखल होण्याच्या चर्चा होत्या. या चर्चा आता संपल्या असून अजित पवार सरकारमध्ये सामील झाले आहेत.

आज सकाळपासूनच राज्यातील राजकारणात भूकंपसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. राष्ट्रवादीचे अनेक आमदार राजभवनात दाखल झाले होते. अजित पवार सरकारमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. परंतु, सरकारकडून याबाबत काहीच अधिकृत खुलासा करण्यात आला नव्हता. अखेर, आज दुपारीच काही वेळापूर्वी राजभवनात शपथविधी सोहळा झाला. यावेळी अजित पवारांनी राज्याच्या उपुख्यमंत्री पदाची शपथ घेत असल्याचं जाहीर केलं. “मी अजित पवार, महाराष्ट्राच्या राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो”, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी उत्सुक असल्याचं बोललं जात होतं. त्यासाठी अजित पवार आपल्या समर्थक आमदारांच्या वतीने पक्षावर दबाव टाकत होते, अशीही चर्चा सुरू होती. यानंतर आज अचानक अजित पवार राजभवनावर दाखल झाले आणि त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राज्याला आता दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत.


अजित पवार यांच्या निर्णयाचे स्वागत करतो. कार्यक्षम सरकारच्या भूमिकांचं त्यांनी समर्थन केलं आहे. त्यांच्यामुळे डबल इंजिन सरकार आता ट्रिपल इंजिन झाले असून सरकारच्या कामाला वेग येईल. 

- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या