Chattar Murder: गुंडांना जात-धर्म-पक्ष नसतो..!

  •  नगरचे चत्तर खून प्रकरण विधानसभेत गाजले
  • आ. बाळासाहेब थोरात यांनी धरले सरकारला धारेवर
  • कठोर कारवाईचे फडणवीस यांचे आश्वासन


मुंबई : नगर शहरात भाजप नगरसेवकाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याचा खून केल्याचे प्रकरण विधानसभेत गाजले. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारत कठोर कारवाईची मागणी केली. फडणवीस यांनीही गुन्हेगाराचा जात धर्म पक्ष न पाहता कायदेशीर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन आ. थोरात यांना दिले.


विधानसभा अधिवेशनाच्या सकाळच्या सत्रात सभागृहात सुरू असलेली चर्चा थांबवून काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी नगरच्या अंकुश चत्तर खून प्रकरणावरून सरकारला धारेवर धरले. सावेडी हत्याकांड आणि हिंदुत्ववादी चळवळीत काम करणार्‍या ओंकार भागानगरे हत्याकांडावर थोरात यांनी प्रश्न विचारला. शनिवारी रात्री दहाच्या सुमारास अहमदनगरमधील सावेडी येथे एक हत्याकांड झाले. यामध्ये अंकुश चत्तर नावाचा युवक जो राष्ट्रवादीचा पदाधिकारी आहे त्याची हत्या झाली. आठ-दहा लोक आले. त्याच्या डोयात मारले. सगळे उपस्थित गुन्हेगार कोण होते हे सगळ्यांनी पाहिले आहे.   यापूर्वीही ओंकार भागानगरे नावाच्या युवकाची हत्या झाली. आता परत दुसरी हत्या झाली. जो गुन्हेगार आहे तो सत्ताधारी पक्षाचा आहे. गृहमंत्री सत्ताधारी पक्षाचे आहेत. खासदारही सत्ताधारी पक्षाचे आहेत. शहराचे आमदार आता सत्ताधारी पक्षाकडे गेले आहेत. जनतेला असे वाटते की, सत्तेकडून त्यांना आधार मिळतोय की काय? संरक्षण मिळते की काय? तशी अहमदनगरमध्ये भावना निर्माण झाली आहे. 

गृहमंत्री फडणवीस यांना संबोधून थोरात म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री इथे उपस्थित आहेत. गुन्हेगाराला जात नसते. गुन्हेगाराला धर्म नसतो. गुन्हेगाराला पक्ष सुद्धा नसतो. जो कोणी गुन्हेगार असेल त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे. नगरमध्ये गुन्हेगारी वाढत चालली आहे. याचा कुठेतरी तुम्ही बंदोबस्त केला पाहिजे. सरकार म्हणून एक अस्तित्व असते. हे दाखवण्याची जबाबदारी आली आहे. लोक भयभीत आहेत. अत्यंत अस्थिर, अशांत वातावरण आहे. या मुद्यावर गृह विभागाची चर्चा घडवून आणण्याची अपेक्षा मी करतो. 

शहर काँग्रेसने सावेडी हत्याकांडावरून विधानसभेत हल्लाबोल केल्यानंतर किरण काळे म्हणाले की, राष्ट्रवादी गद्दार गटाच्या शहराच्या आमदारांनी वास्तविक पाहता या प्रश्नावर सभागृहात आवाज तत्परतेने उठवायला पाहिजे होता. त्यांच्या पक्षाच्या सदस्यांनी सरकारवर हल्लाबोल करायला पाहिजे होता. मी आज आमदार नाही म्हणून मी विधानसभेत जाऊन हा विषय मांडू शकत नाही. असे असले तरी देखील आमचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून नगरकरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न काँग्रेसच्या माध्यमातून सभागृहात मांडला. त्यावर गृहमंत्र्यांनी कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले.


गृहमंत्री फडणवीस यावर उत्तर देताना म्हणाले, सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब थोरात यांना मी अश्वस्त करतो की, गुन्हेगाराची जात, धर्म, पक्ष न पाहता त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. या सभागृहात त्याचे निवेदन देखील ठेवले जाईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या