CRIME : मध्य प्रदेशात लफडं, लोणीत खोली अन् श्रीरामपुरात खून!


सहा महिन्यापूर्वीच्या गुन्ह्यात दोघे जेरबंद




श्रीरामपूर : 15 जानेवारी रोजी 2023 रोजी श्रीरामपूर येथे झालेला अज्ञात तरुणाचा खून मध्य प्रदेश येथील एका अनैतिक प्रकरणातून झाला असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने या गुन्ह्याचा तपास करून मुख्य आरोपीसह दोघांना मध्य प्रदेशातून अटक केली आहे. 


भूपेंद्र शिवप्रसाद रवी, सुरज रामनाथ रावत (दोघे रा. सूनौरा ता. अमरपट्टन, जि. सतना) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर खून झालेल्या इसमाचे नाव सोनू समरलाल चौधरी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. 

18 जानेवारी 2023 रोजी श्रीरामपूर शहराच्या पश्चिमेस असलेल्या एमआयडीसी परिसरात एक अज्ञात तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतदेहाचा चेहरा दगडाने ठेचलेला असल्याने व त्याच्याजवळ ओळख पटेल असे काहीही नसल्याने गुन्ह्याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांपुढे होते. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याकडून या प्रकरणी पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता. दरम्यान, अनेक दिवस गुन्ह्याची उकल न झाल्याने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, पोलीस उपनिरीक्षक तुषार धाक्रव, सोपान गोरे यांच्यासह पोलीस पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केल्यानंतर वॉटरप्रूफिंग (घोटाई)चे काम करणाऱ्या एका बांधकाम कारागिराचा या गुन्ह्याशी संबंध असल्याचा संशय पोलिसांना आला. त्या आधारे गुन्ह्याची उकल झाली.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनू अमरलाल चौधरी असे मृत तरुणाचे नाव असून तो मध्य प्रदेश मधील सतना जिल्ह्यातील सूनौरा गावचा रहिवासी आहे. त्यांचे गावातील एका विवाहितेशी अनैतिक संबंध होते. महिलेच्या पतीने त्यांना पकडले. महिलेला मारहाण करून पतीने घराबाहेर काढले. तिने श्रीरामपूर येथे काम करणारा तिचा मित्र भूपेंद्र शिवप्रसाद रवी याला संपर्क करून हकीकत सांगितली. भूपेंद्रने संबंधित विवाहितेला श्रीरामपूरला आणले. तिला राहण्यासाठी लोणी येथे खोली भाडोत्री घेतली. भूपेंद्रचेही तिच्याशी संबंध प्रस्थापित झाले. तरीदेखील ती विवाहिता प्रियकर सोनू चौधरी याच्याशी लग्न करण्याच्या तयारीत होती. भूपेंद्रने सोनू चौधरीला श्रीरामपूरला बोलावून घेतले. लग्न लावण्याच्या बहाण्याने बोलावलेल्या सोनू चौधरीला दारू पाजून श्रीरामपूर एमआयडीसी परिसरात नेले. तेथे त्याचा खून केला. खून करण्यासाठी त्याला सुरज रामनाथ रावत या त्याच्या मित्राने साथ दिली. 15 जानेवारी ला फोन केल्यानंतर 16 जानेवारी रोजी भूपेंद्रने मैत्रिणीला मध्यप्रदेश मधील आपल्या गावी सोडले. तिच्या दृष्टीने सोनू चौधरी बेपत्ता होता. गावाकडेही कुणालाच खून झाल्याची खबर नव्हती. भूपेंद्र पुन्हा श्रीरामपूरला येऊन त्याचा व्यवसाय करत होता. मात्र पोलिसांनी अखेर त्याला घेरले. 

पोलीस आपल्यापर्यंत पोहोचतील याची कुणकुण लागल्याने गेल्या आठवड्यात भूपेंद्र शिवप्रसाद रवी हा पुन्हा गावाकडे गेला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मध्य प्रदेश मधील सतना जिल्ह्यातील सुनौरा या त्याच्या गावातून त्याला अटक केली. त्याला श्रीरामपूर येथे आणल्यानंतर त्याने संपूर्ण घटनाक्रम सांगत खुनाची कबुली दिली. आज दुपारी त्याच्या साथीदार सुरज रामनाथ रावत याला देखील पोलिसांनी अटक केली. 



या संवेदनशील गुन्ह्याच्या तपासात पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक तुषार धाक्रव, सोपान गोरे यांनी केला. पोलीस हवालदार मनोज गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, रवींद्र कर्डिले, संतोष लोंढे, गणेश भिंगारदे, संतोष खैरे, फुरकान शेख, सागर ससाणे, किशोर शिरसाठ, राठोड, मेघराज कोल्हे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या