- कोळसा व्यापारी गंभीर जखमी
- हल्लेखोरांची मध्यरात्री शरणागती
- कोळसा तस्करीतून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती
राजुरा येथे गोळीबारच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या गोळीबारात भाजप युवा मोर्चाचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे यांच्या पत्नी पूर्वाशा सचिन डोहे (27) यांचा मृत्यू झाला आहे.
शेजारी असणारे कोळसा व्यापारी लल्ली शेरगिल हे या गोळीबारात गंभीर जखमी झाले आहेत. कोळसा तस्करीतून हा गोळीबार झाल्याचे बोलले जात आहे. रात्री उशिरा आरोपीने पोलिसांसमोर शरणागती पत्करली.
ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरातील सोमनाथपूर वॉर्डत रविवारी रात्री घडली. राजुरातील सोमनाथपूर वॉर्डमधील भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे यांच्या घरी रविवारी रात्री अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. गोळी लागून सचिन डोहे यांची पत्नी पूर्वाशा सचिन डोहे (27) यांचा मृत्यू झाला तर शेजारी राहत असलेले कोळसा व्यापारी लल्ली शेरगिल हे यात गंभीर जखमी झाले.
गोळीबार करणाऱ्या व्यक्तीने पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. पोलिसांनी आरोपीचे नाव जाहीर केले नाही. या घटनेत जखमी झालेले लल्ली शेरगिल यांना उपचारासाठी चंद्रपुरात हलविण्यात आले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
0 टिप्पण्या