Manipur Crisis: मुंबईतील काँग्रेसचे आंदोलन चिरडले!


वर्षा गायकवाड यांच्यासह पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात
मुंबई : मणिपूरमध्ये महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईमध्ये माजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या वतीने कॅण्डल मार्च आंदोलन सुरू होताच पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी बळाचा वापर करीत आंदोलकांना ताब्यात घेतले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या दडपशाहीचा निषेध करीत घोषणा दिल्या.


गेल्या तीन महिन्यांपासून भाजपशासित मणिपूर राज्यात आरक्षणावरून आंदोलन चिघळली आहे. दोन समाजातील हा वाद महिला अत्याचारापर्यंत पुढे गेला. एका समाजातील कुटुंबाची हत्या केल्यानंतर दोन महिलांची नग्न दिंड काढण्याचा प्रकार चर्चेत आल्यानंतर देशभर या घटनेचे पडसाद उमटले. संसदेमध्ये तसेच महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. राज्यभर विविध पक्ष संघटनांनी तीव्र आंदोलने केली.
काँग्रेसने मुंबईमध्ये माजी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सायंकाळी मार्च चे आयोजन केले होते. रेडिओ क्लब पासून गेटवे ऑफ इंडिया पर्यंत हा कॅन्डल मार्च जाणार होता. या आंदोलनाला परवानगी नाकारलेली असल्याने आंदोलन सुरू होताच पोलिसांनी आंदोलकांना हटविण्याचा प्रयत्न केला. आंदोलन आणि पोलिसांमध्ये यावेळी बाचाबाची झाली. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करीत आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यात वर्षा गायकवाड यांच्यासह राजू वाघमारे, सिद्दिकी यांच्यासह मुंबई काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या