Politics: शिर्डीचे खा. लोखंडे बीआरएसच्या गळाला..?

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला गळती...?


माजी आ. मुरकुटे यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीने चर्चेला उधाण

बीआरएसचे खा. बी.बी.पाटील यांचा सत्कार करताना खा. सदाशिव लोखंडे व माजी आ. भानुदास मुरकुटे.


श्रीरामपूर : मराठवाडा विदर्भातून मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात आपला विस्तार करत असलेल्या भारत राष्ट्र समिती या पक्षाचा मेळावा रविवारी श्रीरामपुरात झाला. मेळाव्यानंतर नुकतेच तेलंगणाचा विकास पाहून प्रभावित झालेले माजी आमदार आणि अशोक कारखान्याचे चेअरमन भानुदास मुरकुटे यांनी बीआरएसचे खासदार बीबी पाटील यांना निवासस्थानी आमंत्रित केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. चर्चेतील तपशील समजू शकला नाही मात्र सध्या सरकारमध्ये नाराज असलेल्या शिंदे गटाचा खासदार बीआरएसच्या गळाला लागण्याची चर्चा नगर जिल्ह्यात आहे.


तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी सध्या महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले आहे. बहुतेक पक्षातील दुसऱ्या, तिसऱ्या फळीतले नेते त्यांच्याकडे आकृष्ट होत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातही बीआरएस'ने जम बसवण्यास सुरुवात केली असून काही मोठी नावे पक्षात प्रवेश करत आहेत.

 श्रीरामपूर येथे मुळा प्रवराचे माजी संचालक अशोक बागुल यांनी आयोजित केलेल्या मेळाव्याच्या निमित्ताने बीआरएसचे खासदार बी.बी.पाटील शहरात आले होते. मेळाव्यानंतर जेष्ठ नेते भानुदास मुरकुटे यांच्या निवासस्थानी पाटील यांचा सत्कार झाला. शिवसेना शिंदे गटाचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे उपस्थित दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावेळी पक्षाचे बी.जे.देशमुख, सुवर्णा काठे, माणिकराव देशमुख आदी राज्यातील नेते उपस्थित होते. श्रीरामपुरातील लोकसेवा मंडळाचे गणेश भाकरे, अशोक कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर काळे, मिलिंद गायकवाड, विजय नगरकर यावेळी उपस्थित होते. खासदार पाटील तेलंगणा राज्यातील असल्याने भाषेची अडचण जाणवू नये, याची काळजी माजी नगरसेवक शेखर दूबैय्या यांनी घेतली. दूबैय्या यांची मुलगी हैदराबादला दिलेली आहे. जावई कुना विवेक गौड हे चंद्रशेखर राव यांच्या पक्षाचे विद्यमान आमदार आहेत. दूबैय्या हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत आहे. तरीदेखील ते खासदार लोखंडे यांच्या भेटीवेळी उपस्थित होते. विशेष म्हणजे शिंदे गटाचे शिवसैनिक यावेळी उपस्थित नव्हते. 

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यासह शेखर दूबैय्या यांचे जावई आमदार कुना विवेक गौड.


श्रीरामपूरचे माजी आमदार आणि सहकारातील जेष्ठ नेते भानुदास मुरकुटे यांनी गेल्या महिन्यातच तेलंगणात मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांची भेट घेतली. तसेच तिथल्या सरकारच्या कामांची पाहणी करून कौतुक केले होते. मुरकुटे यांनी अद्याप अधिकृत बीआरएस पक्ष प्रवेश केलेला नाही. आता पुन्हा 19 जुलै रोजी ते सुमारे शंभर कार्यकर्त्यांसह तेलंगणा दौऱ्यावर जात आहेत. पक्षप्रवेशाचा निर्णय घेण्यापूर्वी कार्यकर्त्यांना इतर भूत माहिती देणे आणि सर्वांना विचारून निर्णय घेणे, हा लोकशाही मार्ग त्यांनी स्वीकारला आहे. 


मात्र शिर्डीचे शिवसेना शिंदे गटाचे खा.सदाशिव लोखंडे यांनी  खा.पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. विशेष म्हणजे त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित नसताना त्यांनी केलेला सत्कार चर्चेत आला आहे.

खा. सदाशिव लोखंडे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातुन 2014 आणि 2019 ला शिवसेनेच्या तिकीटावर विजयी झाले. ते शिवसेना शिंदे गटासोबत आहेत. 2024 साठी शिर्डी लोकसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला मिळेल, असे बोलले जात असले तरी लोखंडे यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजी वाढल्याचीही चर्चा आहे. विशेष म्हणजे महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार लोखंडे यांच्यात सख्य नाही. निळवंडेचे श्रेय घेण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न विखे पाटील यांना रुचलेला नाही. शिवाय शिर्डी लोकसभा मतदारसंघात शतप्रतिशत भाजप ही मोहीम राबवण्याचे विखे पाटलांनी ठरवलेले आहे. या पार्श्वभूमीवर लोखंडे यांची धाकधूक वाढणे साहजिक आहे. 


या पार्श्वभूमीवर शिर्डी लोकसभा आणि श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने लोखंडे यांच्याकडून काही चाचपणी तर नाही ना अशी चर्चा राजकीय विश्लेषकांत आहे. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ राखीव असल्याने येथून खा.लोखंडे आपल्या मुलाला लाँच करण्याच्या प्रयत्नात असल्याचीही चर्चा आहे. 2009 ला मुंबईतून मनसेच्या उमेदवारीवर पराभूत झालेले सदाशिव लोखंडे यांना शिर्डी-श्रीरामपूर मतदारसंघात आणण्यात अनेक नेत्यांपैकी मुरकुटे यांचेही प्रयत्न होते असे बोलले जाते. भेटीबद्दल फोन न उचलल्याने खा.लोखंडे यांचा अभिप्राय मिळू शकला नाही.   


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या