'मिशन 45'साठी भाजप जिल्हाध्यक्षांची आज मुंबईत बैठक

 राष्ट्रवादीशी जुळवून घेण्याची तयारी; बावनकुळे आणि फडणवीस करणार मार्गदर्शन 




मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जिल्हानिहाय बांधणी सुरु केली आहे. मिशन 45 साठी भाजपची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्षांची उद्या मुंबईत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत ज्येष्ठ नेते पक्ष विस्तारासह महायुतीचे सूत्र समजून सांगणार आहेत. महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेससोबत काम करण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मार्गदर्शन करणार आहेत.

आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकांना समोर ठेवत भाजपचं मिशन 45 सुरू केले आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 पैकी 45 जागा जिंकण्याचं टार्गेट भाजपने ठेवलं आहे. याच मिशनसाठी काही केंद्रीय मंत्र्यांचे दौरे राज्यातील लोकसभा मतदारसंघात पार पडले आहेत. आता भाजपचे प्रमुख नेते विधानसभेच्याही 144 मतदारसंघात दौरे करणार असून निवडणुकीची रणनीती आखणार आहेत. भाजपाच्या मिशन 45 साठी चंद्रशेखर बावनकुळे संयोजक आहेत.


महाराष्ट्रातल्या लोकसभा मतदारसंघांत केंद्रीय मंत्री भेटी देत असून त्यामाध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद सुरू आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने 16 मतदारसंघ निवडले आहेत. त्यापैकी दहा मतदारसंघात शिवसेनेचं प्राबल्य असलेले आहेत. 

बुलढाणा, चंद्रपूर, हिंगोली, औरंगाबाद, पालघर, कल्याण, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, रायगड, बारामती, शिरूर, शिर्डी, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांवर भाजपने लक्ष केंद्रित केलं आहे. बारामती, मावळ, सोलापूर, कोल्हापूर, सातारा या मतदारसंघात भाजप आपली ताकद लावणार आहे. यामध्ये 18 मतदारसंघात भाजप विशेष लक्ष देणार आहे.

भाजपने 12 प्रमुख नेत्यांची या मिशनसाठी निवड केली आहे. प्रत्येक नेत्याकडे दोन लोकसभा मतदारसंघ असं हे गणित आहे. आशिष शेलार, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे हे प्रमुख नेते आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या